वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास

0
915

यवतमाळ,दि.०२ः टिपेश्वर अभयारण्यात गेल्या दोन दिवसांपासून “पीसी”नावाच्या वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकला आहे. त्यामुळे या वाघिणीच्या गळ्यावर मोठी जखम झाली असून, ही वाघीण मदतीसाठी भटकत आहे. वनखात्याला मात्र १ फेबुवारीला या घटनेची माहिती मिळाली आणि खात्याचे पथक त्याठिकाणी रवाना झाले. वाघिणीचे हे छायाचित्र एका वन्यजीव छायाचित्रकार पर्यटकाने टिपल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. स्थानिक शिकाऱ्यांचा धोका या अभयारण्याला सुरुवातीपासूनच आहे. ससे, हरीण आदी वन्यप्राण्यांच्या शिकारी याठिकाणी होतच असतात. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यात वाघाची संख्या वाढत असली तरी त्यांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज आहे.

उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे याठिकाणी टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढणाऱ्या वाघांच्या तुलनेत अधिवास कमी पडत असल्याने येथून वाघ बाहेर पडत आहेत. त्याचाच फायदा शिकारी घेत असल्याचे नुकतेच वाघिणीच्या गळ्यात अडकलेल्या फासवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील वाघांवर बहेलिया शिकाऱ्यांचे संकट गडद झाले असताना या घटनेने राज्यातील वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघांची सर्वाधिक संख्या आहे. येथील वाघ संपूर्ण राज्यात स्थलांतर करीत आहेत. तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिकचा प्रवास या अभयारण्यातील वाघांनी केला आहे.