‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ असा अर्थसंकल्प!-आमदार डाॅ.परिणय फुके

0
18

गोंदिया,दि.०२ः- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी मांडलेला २०२५ चा अर्थसंकल्प हा भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देणारा, प्रगतिशील आणि ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ असा अर्थसंकल्प आहे. सर्व समाजघटकांना अर्थसंकल्पातून दिलासा दिल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे आभार मानतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामान्य घटकांप्रती असलेल्या धेय्य-धोरणांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पातून प्रस्थापित होत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे आमदार डाॅ.परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रगल्भ दिशेने वाटचाल करत असल्याची जाणीव या अर्थसंकल्पातून होते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं सामान्य उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे अशांना कॅपिटल गेन्स वगळता त्यांना टॅक्स रिबेट दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना यंदा टॅक्स भरावा लागणार नाही. हा करदात्यांसाठी मैलाचा दगड ठरेल.

पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेच्या माध्यमांतून राज्यांसोबत भागीदारी केली जाणार आहे. यात कमी उत्पादन असलेले 100 जिल्हे निवडून तिथे काम केल्याने त्याचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल. खाद्य तेलात देशाला आत्मनिर्भर करण्याचा निर्णय देखील महत्त्वपूर्ण आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांची विशेष योजना अंमलात आणली गेल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.

छोट्या उद्योगांना विशेष क्रेडिट कार्ड दिले जाण्याची घोषणाही अर्थसंकल्पात झाली आहे. तसेच, MSME म्हणजेच लघु व मध्यम उद्योगांना 20 कोटींपर्यंतचं कर्ज मिळेल. तसेच स्टार्टअपचं क्रेडिट लिमिट 20 कोटी केलं जाईल. हा निर्णय नवउद्योजकांना नवी उभारी देणारा ठरेल.
मागासवर्गातल्या महिलांसाठी योजना आणि कौशल्य विकास प्रशिक्षण राबवण्याने आपल्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे.

सध्या संपूर्ण जगाचं लक्ष्यं हे AI आधारित तंत्रज्ञानावर आहे. यासाठीच अर्थसंकल्पात एक्सिलेंस फॉर आर्टिफिशियल फॉर AI साठी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही देशातील तरुणांसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट ठरेल. तसेच, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पुढील 5 वर्षांत 75 हजार जागा निर्माण करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच, सक्षम अंगणवाडी 2.0 पोषण मिशन साठी योग्य ती तरतूद केली जाईल आणि या अंतर्गत 8 कोटी मुलांसह 1 कोटी गर्भवती महिलांना लाभ होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा यासाठी अटल टिंकरिंग लॅब ची स्थापना केली जाणार असून पुढील 5 वर्षात देशात 50 हजार लॅब तयार केल्या जातील.

पीएम रिसर्च फेलोशिप स्कीमच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांत पीएम रिसर्च फेलोशिप स्कीममार्फत 10,000 फेलोशिप्स मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असेही आमदार डाॅ.फुके यांनी म्हटले आहे.