कथापूजनऐवजी ग्रामगितेचे वाचन तेरावीनिमित्त कटरे कुटुंबाचा अनोखा उपक्रम

0
64

गोरेगाव, ता. 3 : तालुक्यातील चांदीटोला येथील दसाराम कटरे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी १३ जानेवारीला निधन झाले. त्यांच्या तेरावीचा कार्यक्रम २५ जानेवारीला आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कथापूजन व रुढी परंपरांना फाटा देत मॉडेल कान्व्हेंटचे संस्था सचिव आर. डी. कटरे व देवचंद कटरे यांनी वडिलांच्या तेरावीच्या कार्यक्रमात प्रबोधनकार डॉ. गुरुदास येळेवार यांच्या वाणीतून ग्रामगीतेचे वाचन करून अनोखा उपक्रम राबविला. वडिलांच्या तेरावीनिमित्त कथापूजन न करता ग्रामगीता प्रवचन ठेवण्याची कल्पना आर. डी. कटरे यांच्या मनात आली. त्यांनी मोठे भाऊ देवचंद कटरे यांना सांगितले. त्यांनीही होकार दर्शविला. अखेर ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम ठरला. त्यानुसार, २५ जानेवारीला प्रबोधनकार डॉ. गुरुदास येळेवार यांच्या वाणीतून ग्रामगीतेचे वाचन करून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी. एम. करमरकर होते. श्रद्धांजली कार्यक्रमात एम. एच. गऱ्हाडे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी खासदार खुशाल बोपचे, सभापती चित्रलेखा चौधरी, उपसभापती रामेश्वर महारवाडे, माजी सभापती मनोज बोपचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरधारी बघेले, आर. आर. अगडे, हरीश जैन, प्राचार्य पी. डी. रहांगडाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.