सडक अर्जुनी:–श्री संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ, सौंदड यांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. समाज संघटन, शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा यावर भर देत या कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित होते.
समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, समाजासाठी दीर्घकाळ सेवा दिलेल्या अंगणवाडी सेविका ज्या सेवानिवृत्त झाल्या आहेत, त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी गाव आणि समाजाच्या विकासावर विचार मांडले. त्यांनी “फुल न फुलाची पाकळी” या संकल्पनेवर भर देत समाजाच्या संघटनाचे महत्त्व स्पष्ट केले.
“समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, आर्थिक स्वायत्तता आणि सांस्कृतिक वारसा जपणे गरजेचे आहे. युवकांनी शिक्षण व रोजगाराच्या संधींचा लाभ घेत स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे.” असे त्यांनी सांगितले .कार्यक्रमात स्थानिक मुलींनी सुंदर सांस्कृतिक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.या कार्यक्रमाला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री राजकुमारजी बडोले साहेब, पंचायत समिती सदस्य वर्षाताई शहारे, सरपंच हर्षविनोदकुमार मोदी, व्यापारी आघाडीचे जिल्हा महामंत्री संदीपजी मोदी, माजी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई टेंभुर्णे आणि रमेशजी चुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य शुभम जनबंधू, सरपंच कोहमारा प्रतिभाताई भेंडारकर, महिला अध्यक्ष रंजूताई भोई, कुणबी समाज अध्यक्ष विनय भेंडारकर, तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अखेरीस, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, रोजगार, समाजसेवा आणि सांस्कृतिक जपणूक यामध्ये पुढाकार घेण्याचा संकल्प करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांचे योगदान अमूल्य ठरले.