आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वोतोपरी प्रयत्न- आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके

0
25
अमरावती, दि.5 : देशातील विविधता, सामाजिक समृद्धी आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी भर देणार. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा आढावा डॉ. उईके यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार किरण सरनाईक, आमदार केवलराम काळे, आमदार प्रविण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे, आमदार गजानन लेवटे, प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसीचे किरण पातुरकर, आदिवासी विकास अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित आहे. आदिवासींचे प्रश्न समजून घेण्यासाठी लवकर मेळघाटचा दौरा करण्यात येईल. त्यानुसार तेथील प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नवसारी वसतिगृहाजवळील कचरा काढून ती जागा त्वरित स्वच्छ करण्यात यावी. डीबीटी वेळेवर देण्यात येईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. स्थानिकांची गरज लक्षात घेऊन आदिवासी बांधवांच्या हाताला काम देण्यात येईल. वन हक्क जमीन पट्ट्यांपासून आदिवासी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक सोयी -सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रत्येक आदिवासी महिलेला सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जाईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
यावेळीसामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिंनी, नागरिक यांच्याशी डॉ. उईके यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना आखण्यासाठी संबंधितांना सूचित केले.
डॉ. उईके यांनी सकाळी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेतील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर, ॲड. जे.व्ही.पाटील पुसदेकर आदी उपस्थित होते.