अर्जुनी-मोर :युग पुरुष युवा मंच, पिंपळगाव खांबी यांच्या वतीने परिवर्तनशील साहित्य संमेलन आणि बुद्ध-भीम गीतांचा वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले उपस्थित होते. त्यांच्या विचारमूलक मार्गदर्शनाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
यावेळी विचार व्यक्त करताना आमदार बडोले म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांनी समाजाला विचारांचा नवा मार्ग दाखवला आहे. या विचारांचे सखोल आकलन करून जीवनात त्यांची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. परिवर्तन हे केवळ बाह्य स्वरूपाचे नसून मानसिक आणि वैचारिक परिवर्तन अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे समाजाने संघटित होऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करावी, असे सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान युग पुरुष युवा मंच, पिंपळगाव खांबी यांच्या वतीने आमदार राजकुमार बडोले यांचा नवनिर्वाचित आमदार म्हणुन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा गौरव करत, मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार केले.
या संमेलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. यामध्ये लक्ष्मीकांत धानगाये तालुकाध्यक्षभाजपा सडक अर्जुनी, संदिप कापगते उपसभापती, पंचायत समिती अर्जुनी मोर, दानेश साखरे नगरसेवक, अर्जुनी मोरगाव, व्यंकट खोब्रागडे संचालक, कृ.उ.बा.स. अर्जुनी मोर, दिलवर रामटेके अध्यक्ष, संविधान सेना, डॉ. गजानन डोंगरवार, यशवंत मेश्राम, खुशाल तवाडे, आर. के. जांभुळकर, पिंपळगाव सरपंच विलास फुंडे, चान्नाचे सरपंच सचिन डोंगरे, खांबी सरपंचा निरुपा बोरकर, प्रमोद डोंगरे, प्रशिक मेश्राम, विलास रामटेक, प्रशांत मेश्राम, येरंडी देव सरपंच दिपक कुंभरे आदी मान्यवरांसह समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युग पुरुष युवा मंच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि उपस्थितांनी या वैचारिक मेजवानीचा लाभ घेत, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.