महाआरोग्य शिबिरातील अनेक कक्षात नाव नोंदवणारे अधिकारी गैरहजर
जिल्हा प्रशासनाचे नियोजन अपयशी
गोंदिया,दि.१३ः जिल्ह्यातील कचारगड येथे आदिवासी बांधवाच्या कोया पुनेम यात्रेला सुरवात झाली असून १२ फेब्रुवारीला केद्रीय आदिवासी राज्यमंत्री व राज्याचे आदिवासी विकास मंत्र्याच्या हस्ते मुख्यमंत्री महा आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले.विशेष म्हणजे या महा आरोग्य शिबिराच्या उदघाटनप्रसंगी सुध्दा नागरिकांसह भाविकांनी पाठ फिरवल्याने तिथे उपस्थित आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचीच गर्दी बघावयास मिळाली.तर या आरोग्य शिबिरात तयार करण्यात आलेल्या विविध आजारासंदर्भात माहिती देण्याकरीता तयार करण्यात आलेल्या कक्षाचे प्रमुख व त्यांचे सहयोगी असे नाव लिहिलेले फलक मोठ्या अक्षरात लावण्यात आले होते.परंतु गोंदिया जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकार्यांनी आपले नाव तर दिले मात्र त्याठिकाणी हजर राहयला विसरल्याचे चित्र बघावयास मिळाले.नेहमी राजकीय नेते,मंत्री व अधिकारी सह सामाजिक संघटनाच्या विळख्यात राहणारे वैद्कीय अधिकारी महाआरोग्य शिबिराच्या उदघाटनाच्या दिवशी का गैरहजर राहिले याचा जाब जिल्हाधिकार्यानी विचारुन अशावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे भव्य असा शामियाना तयार करुनही त्या मंडपात यात्रेला आलेले नागरिक व भाविकांना आरोग्याबद्दल काळजी घेण्याकरीता प्रशासन तिथे का आणू शकले नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
या शिबिरात आरोग्य विभाग, के.टी.एस. सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय यांचे मार्फत योजनांची जनजागृती करण्याकरीता ५० स्टाॅल लावण्यात आले होते,मात्र पाहिजे तसा न मिळालेला प्रतिसाद हे स्थानिक नियोजन व प्रशासनाचे अपयश असल्याचे बोलले जात आहे.