अर्जुनी मोरगाव,दि.२५ – संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या महाशिवरात्री यात्रेची तयारी सुरू असताना, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशाकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येणाऱ्या या यात्रेच्या नियोजनासाठी 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला आमदार राजकुमार बडोले, जिल्हा परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश हवेतच विरले
भाविकांच्या सोयीसाठी आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्थेबरोबरच सर्वात महत्त्वाची असलेली दळणवळण व्यवस्था सुधारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. विशेषतः नवेगाव बांध-कवठा-कालीमाती-प्रतापगड मार्गावर दोन्ही बाजूंनी मुरूम ब्लॅंकेटिंग करून रोलरने कॉम्पेक्शन करण्याच्या सूचना बांधकाम उपविभाग अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी श्री. दरवडे यांना दिल्या होत्या.मात्र, बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही हा मार्ग सुधारण्यात आलेला नाही. यामुळे यात्रेकरूंना धुळीच्या लोटातून प्रवास करावा लागत असून, संभाव्य अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर
रस्त्याचे काम करण्यासाठी आवश्यक मुरूम उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मामा तलावातील मुरूम काढण्यास परवानगी दिली होती. परंतु, तरीही बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही, हे आश्चर्यकारक असून भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.तसेच, खैरी सुकडी-कालीमाती-प्रतापगड रस्त्यावर अग्रवाल बांधकाम कंपनीने केलेल्या कामावर रोलर चालवून सपाटीकरण करण्याचे आदेशही धुडकावले गेले. परिणामी, या मार्गावर वाहने उलटण्याचा व अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
बांधकाम विभागावर कारवाई होणार का?
आजपासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येथे दाखल होणार आहेत. परंतु, बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.