अर्जुनी मोरगाव,दि.२५– प्रतापगड महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या गोठणगाव तलाव परिसरात प्रथमच वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक वन व्यवस्थापन समिती व सुजल बहुउद्देशीय सामाजिक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी मोठे पाऊल
गेल्या अनेक वर्षांपासून गोठणगाव तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत होते, मात्र पार्किंगच्या अभावामुळे वाहतूक कोंडी व असुविधा निर्माण होत होती. यावर उपाय म्हणून समितीने जेसीबी व स्वयंसहाय्यक गटांच्या मदतीने विस्तीर्ण वाहनतळ तयार केला आहे.तसेच, रस्त्याच्या दुतर्फा पडलेला कचरा स्वच्छ करून परिसर अधिक सुशोभित करण्यात आला आहे, जेणेकरून पर्यटकांना स्वच्छ व सुंदर वातावरणात तलावाचे दर्शन घेता येईल.
समाजसेवकांचा मोलाचा सहभाग
या स्वच्छता मोहिमेत सुजल सेवा समितीचे अध्यक्ष किशोर तरोणे, पतिरामजी राणे, रवींद्रजी घरातकर, नोकेशजी धोटे, ग्रामविकास अधिकारी कांतीलाल डोंगरवार, मनोहरजी धानगुण, रेवनाथजी परतेकी यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला.प्रतापगड यात्रेकरू दर्शनानंतर गोठणगाव तलावाला भेट देऊन नवेगाव बांध मार्गे परतीला जातात. त्यामुळे येथील पर्यटन व्यवस्थापन सुधारल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे मत सुजल सेवा समितीचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी व्यक्त केले.स्वयंसेवी संस्थांच्या श्रमदानातून विकसित झालेल्या या वाहनतळामुळे पर्यटकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.