लोकहिताच्या कामांसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावी – जिल्हाधिकारी प्रजित नायर
गोंदिया, दि.27 : लोकहिताच्या कामांसाठी सर्व संबंधित विभागाने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित कामांना प्राधान्य देवून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून यंत्रणांनी समन्वयाने कामे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज (ता.27) गोंदिया तालुक्यातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, सा.बां.विभाग क्र.1 चे कार्यकारी अधिकारी अभियंता नरेश लभाने यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, नागरिकांना पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत क्षेत्र भेटी देवून नागरिकांच्या विविध समस्या जाणून घ्यावेत व त्यांना होणारा त्रास व समस्यांचे निराकरण करावे. तसेच जिल्हास्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव यांचा पाठपुरावा करुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत व स्थानिक स्तरावर ‘झिरो पेंडन्सी’ची संकल्पना अनुसरुन कामे करावीत असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. स्थानिक स्तरावरील लोकांच्या हितासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव तयार करुन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे व त्याबाबतचा पाठपुरावा संबंधित विभाग प्रमुखांनी करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी रजेगाव काटी मध्यम प्रकल्प अंतर्गत सावरी, रावणवाडी व लोधीटोला येथील बाधित शेतजमिनीचा मोबदला अदा करण्यात यावा. बिरसी विमान प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसन बाधित समस्या तसेच पुनर्वसन गावठाणात मूलभुत सुविधा उपलब्ध करुन द्यावे. परसवाडा, कामठा रस्त्याचे पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा. तसेच गोंदिया नगर परिषद अंतर्गत घनकचरा प्रकल्प, आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, ओ.बी.सी. मुला-मुलींचे वसतिगृह, कृषि महाविद्यालय, केंद्रीय विद्यालय व शासकीय जिल्हा ग्रंथालय यांचेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. पांगोली नदीचे पुनर्जीवन करण्यात यावे. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टी बाधित घरांचे नुकसानी संदर्भात तसेच घरात पाणी शिरले असतांना सुध्दा बाधितांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही याबाबत आढावा घेवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या.
सभेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे, तहसिलदार समशेर पठाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके यांच्यासह विविध विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.