नागपुरात औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला, दोन गटात तणाव, दगडफेक आणि जाळपोळ

0
225

नागपूर : औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन
मुख्यमंत्री कार्यालयानुसार, “नागपूरच्या महाल भागात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आम्ही सतत पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा.”
उपराजधानी नागपूरमध्ये दोन गटात निर्माण झालेल्या तणावाच्या वतावरणामुळे (Nagpur Violence) संपूर्ण जिल्हा हादरला आहे. शहरातील महाल भागात संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाली आहे. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचे मोठे नुकसान झालं आहे. परिणामी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून काल (17 मार्च) उशीरापर्यंत कसोशीने प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. तर रात्रभरात जवळ जवळ 80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दीड हजार सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर
दुसरीकडे, नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने दंगल होत असताना सुमारे दीड हजार वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवर करडी नजर ठेवून 50 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि सुमारे 150 आक्षेपार्ह पोस्ट आयडेंटिफाय केल्याची माहिती आहे. या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून डिजिटल माध्यमांवरही दंगल सदृश्य स्थिती निर्माण करण्याचा काहींनी प्रयत्न केल्याचं सायबर सेलला वाटतंय. या आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकणाऱ्या विरोधात कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे.

अनेक वाहनांची तोडफोड, परिसरात संचारबंदी लागू
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये सध्या तणावपूर्व शांतता आहे. किंबहुना महाल भागात पोलीसांचा तगडा बंदोबस्त असून परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर परिसरात संचारबंदी धारा 144 लागू करण्यात आली आहे. रात्रभर पोलिसांनी अटक सत्र सुरु करून जवळ जवळ 80 दंगलखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर जवळपास 1800 सोशल मीडिया सायबर पोलिसांकडून सर्च करण्यात आले आहे.

त्यातील 55 आक्षेपार्य विडिओ व मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट आता पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. मध्यरात्री महालनंतर नागपूरच्या हंसापुरी भागात देखील तणाव निर्माण झाला होता. यात 20 ते 22 वाहनांची जबर तोडफोड झाली आहे. मात्र सध्या नागपूरची परिस्थिती पूर्णतः पोलीसांच्या नियंत्रणात असल्याची ही माहिती आहे.

दगडांचा खच उचलला, प्रशासनाचे आवाहन
तर जिथे काल रात्री दंगल उसळली होती त्या भागात रात्रभरात स्वच्छता मोहीम राबवून दगडांचा खच उचलला आहे. तसेच जाळपोळीचे चिन्ह ही हटविले आहे. प्रशासनाकडून परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सध्या करण्यात येत आहे.या घटनेवर पोलीस प्रशासनानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणात सामील असलेल्यांचा शोध घेतला जात आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी बाकावर बसलेल्या सर्वच पक्षांनी शांतता राखावी, कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. सोबतच नागपुरात अशी परिस्थिती नेमकी का निर्माण झाली? याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.