जिल्ह्याच्या विकासासाठी खा.प्रफुल पटेल व पालकमंत्र्यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक

0
128

गोंदिया,दि.२२- जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पालकमंत्री बाबासाहेब पाटील व खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागाच्या विकास कामांची आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीला जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, नॅशनल हायवे व MRDC चे अधिकारी उपस्थित होते.
उड्डाणपूल व मेडिकल कॉलेजच्या कामाचा आढावा

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल (ROB) मरारटोली-रिंग रोड, हड्डीटोली उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम किती पुर्ण झाले तसेच हे काम केव्हापर्यंत पुर्ण होणार व सुरु असलेल्या कामांची स्थिती काय याचा आढावा बैठकीत घेतला.
गोंदिया शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा

शहरातील नाट्यगृह, नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत, दुर्गा चौकातील पोलिस चौकीचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याबद्दल पालकमंत्री व खा. पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना केला. सुभाष गार्डनचे काम व आधुनिक विद्युत दाहिनी अद्यापही सुरु झाले नाही. गोंदिया शहरातील साफ सफाई, शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावा तसेच शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला तसेच भूमिगत गटार योजनेत प्रलंबित होत असलेल्या कार्याला लवकरात लवकर पूर्ण करणे, डपिंग यार्ड व धोटे सुतिका गृहाच्या कामाचा आढावा घेतला व सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश न.प.मुख्याधिकारी यांना दिले.
जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना

जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी याकरीता नवेगाव, नागझिरा व बोदलकसा पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
कृषीपंपाना अंखडीत वीज पुरवठा करा

जिल्ह्यात रब्बी हंगामातील धानाची ४५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली. कृषी पंपाना अखंडीत वीज पुरवठा होत नसल्याने रब्बी पिके अडचणीत आले आहे. तसेच आमगाव व अर्जुनी मोरगांव येथील महावितरण ने अडचण प्राधान्याने दूर करुन कृषी पंपांना अखंडीत वीज पुरवठा करावा तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होणार याची काळजी घेण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या.
सिंचन प्रकल्पाची प्रलंबित कामे मार्गी लावा

जिल्ह्यातील झाशीनगर, रजेगाव-काटी व तेढवा – शिवनी या सिंचन प्रकल्पांसह इतर सिंचन प्रकल्पाची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावून सिंचनाचा मार्ग मोकळा करा. यात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास सांगा त्या आपण प्राधान्याने मार्गी लावू असे खा.श्री प्रफुल पटेल यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. पालकमंत्र्यांनी सुध्दा ही कामे प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या तसेच सिंचन प्रकल्प व ROB चार पदरी रस्त्यांबाबत मुंबई येथे संबंधित मंत्र्यांशी बैठक घेण्याचे निश्चित झाले.
समृध्दी महामार्गाचे काम युध्द पातळीवर पुर्ण करा

खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांनी मंजूर नागपूर-गोंदिया द्रुतगती समृध्दी महामार्गाचे काम जलद गतीने पुर्ण व्हावे यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी नियमित आढावा घेवून त्यातील तांत्रीक अडचणी दूर करुन या महामार्गाचे काम युध्द पातळीवर पुर्ण करा, हे काम वेळेत पुर्ण करुन जिल्ह्याच्यासमृध्दीचा मार्ग सुकर करा असे निर्देश देत खासदार पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी या प्रकल्पाला प्राधान्य देत कार्यारंभ करण्याबाबत चर्चा केली.
एकात्मिक आदिवासी विभाग देवरी अंतर्गत गोंदिया येथे नवीन वसतिगृहासाठी जमीन अधिग्रहण, शासकीय धान खरेदी, बोनस व धान भरडाईची काय स्थिती याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातंर्गत शहरातील भूमिगत गटार योजना व महावितरणच्या शहरातील भूमिगत विद्युत लाईनच्या कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी प्रामुख्याने बैठकीला माजी आमदार राजेंद्र जैन जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.