संजय पुराम : शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा!

0
11

देवरी :केंद्र व राज्य शासनातर्फे सुरु असलेल्या लोक कल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना योग्य मार्गदर्शन करा व जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा असे निर्देशात्मक प्रतिपादन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी केले.
येथील आफताब मंगल कार्यालयात उपविभागीय अधिकारी (राजस्व) कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘महसूल दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी सूनील सूर्यवंशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार,भाजपा तालुकाध्यक्ष व नगरसेवक यादोराव पंचमवार, जि.प. सदस्य उषा शहारे, देवरीचे तहसीलदार संजय नागरीकर, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगडे, आमगावचे तहसीलदार साहेबराव राठोड, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, खंडविकास अधिकारी डॉ. कोळेकर उपस्थित होते.
महसूल विभागाचे दैवत देव पामलेदार, महात्मा गांधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रा.अंजनकर यांनी, महसूल सप्ताहानिमित्त आयोजीत महिला सक्षमीकरण कार्यक्रमावर मार्गदर्शन करीत महसूल दिनाचे महत्व पटवून दिले. सुनील सूर्यवंशी यांनी, महसूल विभागाच्या सर्व योजनांची इत्थंभूत माहिती देत विभागाची कार्यप्रणाली, महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
प्रास्ताविक तहसीलदार नागरीकर यांनी मांडले. संचालन प्रा.गजानन अंजनकर यांनी केले. आभार तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महसूल विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.