गोंदिया,दि.०७ एप्रिल- अलिकडे, उन्हाळी पिकांसाठी ८ तास शेती वीज आपूर्ति होत असल्याने, पिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी फेब्रुवरी महिन्यात तत्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईल संदेश पाठवून शेतीचा वीजपुरवठा १२ तासांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. सरकारने या संदेशाला तात्काळ प्रतिसाद दिला आणि वीज विभागाला १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले होते.
सरकारच्या आदेशानुसार, वीज विभागाने शेतीसाठी १२ तास वीजपुरवठा केला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली.परंतु आता भर उन्हाळ्यात वीज विभागाने वीजपुरवठा 12 तासांवरुन ८ तासांपर्यंत कमी केल्याने ही समस्या पुन्हा गंभीर झाली आहे. सरकारी आदेशांची अंमलबजावणी न केल्याने आमदार विनोद अग्रवाल पुन्हा आक्रमक झाले आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता रामाराव राठौड़, कार्यकारी अभियंता आनंद जैन, यांच्याशी चर्चा करून आणि पत्र देऊन, रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच १२ तास वीजपुरवठा करण्याची मागणी केली. या मुद्द्यावर संताप व्यक्त करताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले की, शेतकऱ्यांनी १२ तास विजेची उपलब्धता लक्षात घेऊन रब्बी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. परंतु वीज ८ तासांपर्यंत कमी केल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
ते म्हणाले, वीज कपातीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये व्यापक असंतोष निर्माण झाला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर शेतकऱ्यांना तात्काळ १२ तास वीजपुरवठा पूर्ववत केला नाही, तर आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी विभागाची असेल.
निवेदन देताना वेळी सरपंच संदीप तुरकर, विक्की बघेले, ललित खजरे, लुकेश बंशपाल, रुद्रसेन खांडेकर, रूपचंद पटले, हीराजी बघेले, संजय कुंभलवार, अक्षय कहनावत, मुकेश बघेले, राहुल पटले, हरलाल बघेले, आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते.