चिचगड परिसरातील विद्युत भारनियमन त्वरीत बंद करा

0
242

नागरिकांचे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

 

 देवरी,दि.०८ – गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देवरी तालुका महावितरणच्या सततच्या जाचाला समोर जात असून आर्थिक,सामाजिक आणि मानसिक शोषण सहन करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून विजग्राहकांनी अखेर काल सोमवारी (दि.०७) देवरी येथील महावितरण च्या विभागीय कार्यालयाला घेराव करून कार्यकारी अभियंता फुलझले यांना निवंदन दिले.

निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंढळात देवरीचे उपसभापती शालिकराम गुरुनुले,मगरडोह ग्राम पंचायत उपसरपंच देवविलास भोगारे,यशवंत गुरुनुले, गणेश तोफे,महेंद्र निकोडे, राजेश चांदेवार, विलास निकुरे, बाळकृष्ण गायधने,हंसराज हुकरे यांचा समावेश होता.  या निवेदनात प्रामुख्याने महावितरणच्या चिचगड येथे असलेले उपकेंद्राअंतर्गत सर्व गावांत ४४० के.व्ही.चा विद्युत पुरवठा करण्यात यावा, चिचगड उपकेंद्र येथे १० एमव्हीए चे पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध करून देण्यात यावे, या उपकेंद्राअंतर्गत सर्व गावांचे भारनियमन बंद करून नेहमी करिता अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा,सन २०२५ पूर्वी कृषी पंपा करिता डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना कृषी विद्युत मीटर देण्यात यावे, चिचगड उपकेंद्राचे विद्यमान कार्यरत कनिष्ठ अभियंता यांच्या ऐवजी दुसऱ्या अभियंताची पदस्थापना करण्यात यावी, सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून नागरिकांना नियमित विद्युत सुविधा देण्यासाठी सक्तीचे करावे इत्यादि मागण्यांचा समावेश आहे. या संदर्भात देवरी उपविभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण झालेल्या विद्युत अडचणीतून मार्ग काढून त्यावर उपाययोजना करून यावर नियोजन करून नागरिकांच्या मागण्या मान्य करीत येत्या दोन दिवसात सर्व अडचणी मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले.

या निवेदनाच्या शिष्टमंडळात चिचगड जिल्हा परिषद क्षेत्रातील कलिंद्र गुरूनुले,आसाराम पालीवाल, देवेंद्र गावळ, एकनाथ सोनुले,चिंधु निकोडे, हंसराज ठाकरे यांच्यासह पालांदूर,मगरडोह,टेकरी,रामगड,सुकळी,ढोडरा,रोपा, सिंगनडोह,घोनाडी, बोन्डे,पळसगांव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.