अकोला – जिल्हा परिषद अंतर्गत सत्र २०२४-२०२५ च्या दलित वस्तीचा निधी अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने सप्टेंबर २०२४ मध्ये नियमाप्रमाणे व मंजूर नियत्वनुसार मंजूर केला होता. त्याअनुषंगाने सदर निधी वितरित करण्यासाठी नियमानुसार व परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला महाराष्ट्र शासन यांना दिला होता. परंतु दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अकोला जिल्हयाचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीचे दोन इतिवृत्त तयार करून मागासवर्गियांसाठी राखीव असलेला मंजूर दलित वस्तीचा निधी इतरत्र वळवला याविरूध्द माजी समाज कल्याण सभापती आम्रपालीताई खंडारे आणि काही सरपंच यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी याचिका क्र.२४०३/२०२५ ची सुनावणी घेत असतांना दि.५ मे २०२५ रोजी सदर हस्तांतरित झालेल्या निधी वितरणाला स्थगनादेश दिला असून जिल्हाधिकारी अकोला यांना या संदर्भात याचिकेत नमूद सर्व मुद्यांवर शपथपत्र दाखल करण्यास निर्देश दिलेले आहेत.
एकाच बैठकीचे दोन वेगवेगळे इतिवृत्त तयार करणे, नियमानुसार प्रस्ताव असतांनादेखील त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेला निधी इतर प्रयोजनाकरिता बेकायदेशीरपणे वळवणे अशा अनेक मुद्यांवर याचिका दाखल आहे. फंडस् ट्रान्सफर करतांना अतिशय अवाजवी घाई केली आहे, हे सुध्दा याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.
मुळात ज्या उद्देशासाठी मागासवर्गियांसाठी सरकारकडून निधी आले आहे, ते दुसऱ्या संस्थानला वळवणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत प्रतिवादी म्हणून पालकमंत्री अकोला, सचिव समाजकल्याण विभाग मंत्रालय मुंबई, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग अकोला, जिल्हाधिकारी अकोला, सचिव जिल्हा नियोजन समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला, कृषी विकास अधिकारी जि.प. अकोला यांना केलेले आहे.
याचिकाकर्त्यांच्यावतीने उच्च न्यायालय नागपूर येथे अॅड. आनंद राजन देशपांडे यांनी बाजू मांडली.
पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय सदस्य अरुंधती सिरसाठ, युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, महिला आघाडी अध्यक्ष व माजी समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, माजी गट नेता ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, विकास सदांशिव, पराग गवई, अविनाश खंडारे प्रामुख्याने उपस्थित होते.