नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सद्यस्थितीत एलआयटी परिसरात असलेला परीक्षा विभाग महाराज बाग चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात स्थानांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रस्तावित परीक्षा विभाग इमारतीची पाहणी माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांनी बुधवार, दि. ७ मे २०२५ रोजी केली. प्रस्तावित इमारतीत दुरुस्ती तसेच विजेची कामे तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्या.
विद्यापीठाचा परीक्षा विभाग सद्यस्थितीत अमरावती रोडवरील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ परिसरात आहे. या परीक्षा विभागाचे लवकरच स्थानांतरण महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात केले जाणार आहे. जुन्या इमारतीत परीक्षा भवन स्थानांतरण केले जाणार असल्याने येथील व्यवस्था तसेच दुरुस्ती कार्य गतीने होणे आवश्यक आहे. परीक्षा विभागाकरिता आवश्यक जागा तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने विविध विभाग कोणत्या ठिकाणी स्थानांतरित केले जाणार आहे, याबाबत प्र-कुलगुरु डॉ. कोंडावार यांनी माहिती घेतली. यावेळी अभियांत्रिकी विभागातील महेंद्र पाटील यांनी प्र-कुलगुरु डॉ. कोंडावार यांना याबाबत माहिती दिली. या इमारतीतील दुरुस्ती तसेच विद्युत कामे तातडीने करण्याच्या सूचना यावेळी अभियांत्रिकी विभागाला देण्यात आल्या.