जिल्हा परिषद वाशिमचा राज्यात चौथा क्रमांक  

0
26
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
वाशिम, दि.७ मे -राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष विकास अभियानात जिल्हा परिषद वाशिमने संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या १०० दिवस अभियानाचा उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणी करून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहचवणे, ग्रामविकासाच्या प्रक्रियेला गती देणे आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हा होता. हे अभियान प्रशासनाच्या गतिमानतेचा आढावा घेणारे, उद्दिष्टांवर आधारित आणि वेळेवर परिणाम साधणारे असे ठरले.
जिल्हा परिषद वाशिमने या अभियानात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, जलसंधारण, ई-गव्हर्नन्स, रोजगार निर्मिती आणि ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावली. यामुळेच वाशिम जिल्ह्याला राज्यस्तरावर चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा एकत्रित करून, नियोजनबद्ध कार्यपद्धती, सततचा आढावा, स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी आणि जनतेच्या सहभागावर भर देऊन या अभियानाला यशस्वी केले. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल राज्य सरकारने घेतली असून, मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
या यशामागे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, स्वयंसेवी संस्था आणि जनतेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे यश संपूर्ण जिल्ह्याचे असून, भविष्यातील विकासासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
जिल्हा परिषद वाशिमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. विकासाच्या दिशेने एक पुढचे पाऊल म्हणून या यशाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.