वाशिम,दि.११ मे – जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता वाढविण्यासाठी “आपदा मित्र” प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मुंबई येथील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि आयटस संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १९ मे २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण महिला व बालविकास भवन येथे घेतले जात आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सामाजिक कार्यकर्ते गजानन मेसरे, आयटस संस्थेचे श्री.फय्याज व अन्य प्रशिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात वाशिम, रिसोड आणि मालेगाव येथील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. हे प्रशिक्षणार्थी ‘आपदा मित्र’ व ‘आपदा सखी’ म्हणून पुढील काळात कार्य करणार आहेत.आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करताना अपर जिल्हाधिकारी घुगे म्हणाले, “आपत्ती कधीही, कुठेही येऊ शकते. अशा प्रसंगी आपण सज्ज असलो तर आपत्तीचे संकट संधीमध्ये रूपांतरित होऊ शकते.
तहसीलदार पळसकर यांनी “आपत्ती व्यवस्थापन मित्र” संकल्पनेची माहिती देताना सांगितले, “आपण केवळ स्वयंसेवक नसून, समाजाचे खरे रक्षक आहोत. आपत्तीच्या वेळी सजग आणि तत्पर नागरिक म्हणून भूमिका बजावणे हीच खरी सेवा आहे.”
या प्रशिक्षणामध्ये प्राथमिक उपचार, अग्निशमन तंत्र, सुरक्षित बचाव उपाय, जलद प्रतिसाद प्रणाली , टीमवर्क व समन्वय अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार असल्याचे शाहू भगत यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रशिक्षक अनिकेत जाधव, रुचिका शिर्के, सौरभ कांबळे, यश पवार, वाशिम येथील प्रशिक्षक अनिल वाघ, तसेच नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी प्रदीप पट्टेबहादूर यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणात आशा व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. आभार प्रदर्शन प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले.