नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ घटले,प्राणी गणनेत २३०२ वन्य- प्राण्यांची नोंद

0
17

गोंदिया : दरवर्षीप्रमाणे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राणी गणना केली जाते, यंदा १२ मे रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली. त्यात दहा वाघांची, तर २४ बिबट्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी तुलनेत यंदा दोन वाघांची संख्या कमी झाली, तर सहा बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे प्राणी गणनेच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. बौद्ध पौर्णिमेला चंद्राच्या उजेडात प्राणी गणना केली जाते. दि. १२ मे रोजी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्राणी गणना करण्यात आली. प्राणी गणना करण्यासाठी ७५ मचाणावर सज्ज असलेल्या १५६ वन्यप्रेमी व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व श्रेणीच्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात १० वाघांसह एकूण २३०२ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यप्रेमींसाठी आगामी काळात आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. प्राणी गणनेदरम्यान नवेगाव, राष्ट्रीय उद्यान, पिटेझरी, कोका, मंगेझरी या क्षेत्रांत गणना पथक कार्यरत करण्यात आले. या गणना प्रक्रियेत वाघ, बिबट, रानकुत्रा, हरीण, अस्वल, रानडुक्कर, मुंगूस, रानगवे, नीलगाय, सांबर, चितळ, वानर, मोर, साळींदर, रानमांजर, उदमांजर, भेटकी, तडस, हळद्या, कोकिळा, सनबर्ड, घार, चौसिंगा, पॅगोलियन, ससा, लाल तोंड्या माकड, गरुड, रानमांजर, पाहायला मिळाले. एकंदरीत नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन परिसरात सर्व वर्गीय २३०२ प्राण्यांची नोंद करण्यात आली. तर गेल्यावर्षी १९८५ वन्यप्राण्यांची नोंद झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याने वन्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन परिसर मोठ्या प्रमाणात व्याप्त आहे. या परिसरात पिटेझरी, नागझिरा, उमरझरी, डोंगरगाव, बोंडे, राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध व कोका या क्षेत्रांचा बफर झोनमध्ये समावेश आहे.नागझिरा बफर झोन परिसरात गणनेसाठी असलेल्या यंत्रणेची चांगलीच पर्वणी झाली. या क्षेत्रात एकूण २३०२ वन्यप्राण्यांच्या नोंदींपैकी तब्बल ६७५ प्राणी याच क्षेत्रात नोंदविण्यात आले आहेत.

प्राणी गणना २०२५ प्राणी गणना २०२४
वाघ – १० १२
बिबट २४ १८
रानकुत्रे ६३ ८२
सांबर ४२
चितळ १६८ ११५
रानगवा ८८६ ७२०
अस्वल ९७ ७५
नीलगाय ८८ ७१
रानडुक्कर २५५ १२८
चौसिंगा १३ ०३
मोर १२० १३६
१२ मे ते १३ मे २०२५ दरम्यान सेवा संस्था गोंदिया, वनविभाग गोंदिया, नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्प आणि FDCM गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. दिनांक १२ मे २०२५ रोजी जांभळी वनपरिक्षेत्र कार्यालयात सेवा संस्थेचे सर्व स्वयंसेवक व वनकर्मचारी एकत्रित आले. त्यानंतर मचाण आरक्षण (Allotment) करण्यात आले. प्रत्येक मचाणावर १ ते २ स्वयंसेवक व १ ते २ वनकर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण कॉरिडोर/बफर क्षेत्रामध्ये एफ.डी.सी.एम. मधील जांभळी १ व जांभळी २ वनपरिक्षेत्रात व प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील सडक अर्जुनी, गोरेगाव, गोंदिया मध्ये जवळ पास २३ मचाणावर सेवा संस्थेचे स्वयंसेवी व वनकर्मचारी यांनी निसर्गानुभव घेत प्रगणनेत भाग घेतला.
प्रगणनेत नोंद करण्यात आलेल्या प्राण्यांची सूची…. वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, चितळ, सांभर, रानगवा, रानटी डुक्कर, चौसिंगा इत्यादी वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली.
मचाण निसर्गनुभव निरीक्षण/प्राणी प्रगणना प्रमोद पंचभाई, उपवनसंरक्षक गोंदिया ,ए.डी.नागे, विभागीय व्यवस्थापक वनप्रकल्प विभाग भंडारा,सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. तसेच दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया,मंगेश बागडे वनपरिक्षेत्र अधिकारी जांभळी १, श्री डोंगरावर वनपरिक्षेत्र अधिकारी जांभळी २,एम.के.गडवे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोरेगाव,मिथुन तरोने,वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी,सेवा संस्थेचे कन्हैया उदापूरे, सुशील बहेकार, गौरव मटाले, डीलेश कुसराम, लोकेश भोयर, प्रवीण मेंढे, पवन सोयाम, नदीम खान, प्रतिक लाडेकर, निशांत कुर्वे, अमेय निनावे, हसीन चिखलोंडे, मनीष ढोमणे, सागर कंसारे, संजू डूभरे, अरुण तिवारी, फरहान सिद्दिकी, सानिध्य गजभिये, प्रणय ठाकरे, रिषभ मारवाडे, आकाश यादव असे जवळपास ४० ते ५० सेवा संस्थेचे सदस्य मिळून हे निसर्गनुभव उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले. या उपक्रमामध्ये सेवा संस्थेचे स्वयंसेवक व वनविभागाचे कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या सहभागी होऊन वन्यजीव प्रगणना (सर्वेक्षण) यामध्ये सहभाग घेतला. वनविभागाचे व सेवा संस्थेच्या स्वयंसेवीचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले, ज्यामुळे उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.