
भंडारा, १० जून –जिल्ह्यातील अनिकेत नगरकर यांची महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी निवड झाली आहे. ही फेलोशिप राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये थेट काम करण्याची संधी देत असून, तरुण नेतृत्वाला प्रशासनाच्या जवळून अनुभवाची आणि सामाजिक परिवर्तनात योगदान देण्याची संधी मिळते.
अनिकेत नगरकर यांनी दिल्लीतील डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यापीठातून डेव्हलपमेंट स्टडीज (Development Studies) या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या अनिकेत यांनी स्वप्नपूर्ती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत कार्य सुरू केले. पुण्यात पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी राहुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेएर ऑफ फिजीकली चॅलेंज्ड (NAWPC) या संस्थेसोबतही कार्य केले. ही संस्था दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असून, त्या माध्यमातून अनिकेत यांनी दिव्यांग मुलांसाठी चांगले काम केले, विविध उपक्रम राबवले.
सामाजिक विकास, शैक्षणिक प्रबोधन आणि समावेशी समाजनिर्मितीच्या दिशेने अनिकेत यांचे कार्य सुरु आहे. मुख्यमंत्री फेलोशिपच्या माध्यमातून ते पुढील एक वर्षासाठी मुख्यमंत्री कार्यालयासोबत थेट कार्यरत राहून शासनाच्या विविध योजनांवरील नेमून दिलेल्या प्रकल्पांवर काम करतील. त्यांना धोरणात्मक निर्णयप्रक्रियेचा अनुभव मिळणार असून, स्थानिक आणि राज्यस्तरीय समस्यांवर नवोन्मेषी उपाययोजना सुचवण्याची संधी मिळेल. भंडारा जिल्ह्याच्या युवकांसाठी ही एक प्रेरणादायी बाब असून अनिकेत यांची निवड हा जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
—–
मुख्यमंत्री फेलोशिपसाठी माझी निवड झाली ही माझ्यासाठी निश्चीचत अभिमानाची बाब आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही प्रतिष्ठित संधी मिळणे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी महत्त्वाची ठरेल. या फेलोशिपमुळे मला प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करता येईल, ते समजून घेता येईल तसेच धोरण अंमलबजावणीसह शासन प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेता येईल. या माध्यमातून नव्या गोष्टी शिकण्यास आणि महाराष्ट्र राज्याचा सर्वसमावेशक व शाश्वत विकास साधण्यासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे. या निवडीसाठी मी मला मार्गदर्शन केलेल्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे, मी प्रामाणिकपणे व निष्ठेने हे काम करेन.
– अनिकेत नगरकर