लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ताची तपासणी करून घ्या-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पटले

0
21

जागतिक सिकलसेल आजार दिन दि. 19 जुन अनुशंगाने
लग्नापुर्वी ठेवा मनीसिकलसेलची तपासणी च्या घोषणांनी दुमदुमले शहर

गोंदिया,दि20- दि. 19 जुन रोजी जागतीक सिकलसेल आजार दिनाच्या अनुषंगाने सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन के.टी.एस. शासकीय सामान्य रुग्णालय येथे संपन्न झाली.जिल्ह्यात जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र येथे सर्वत्र सिकलसेल संबधाने सोल्युबिलिटी तपासणी मोफत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.
सिकलसेल जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले.प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंदिरा गांधी स्टेडियम मैदान-बाजार चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली.लग्नापुर्वी ठेवा मनी- सिकलसेलची तपासणी, लग्नाआधी करा विचार-सिकलसेलचा टाळा आजार,सिकलसेल हा होत नाही स्पर्शाने-हा होतो वंशाने असे विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली.
प्रभातफेरी दरम्यान बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी तसेच आरोग्य विभागाचे डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,डॉ.पवन राऊत,डॉ.भारती जयस्वाल,डॉ.अजय घोरमारे,डॉ.अनिल आटे,डॉ.सुवर्णा हुबेकर,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.इ.सी.अधिकारी प्रशांत खरात,सिकलसेल समन्वयक स्वपना खडाईत यांचे सोबत सिकलसेल कार्यक्रमाचे निशा डहाके,निता फुले,सुरेंद्र पारधी,योगेश नैताम सह राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाचे समन्वयक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रभातफेरी दरम्यान बँनर द्वारे जनजागृती तसेच सिकलसेल आजाराबाबतचे पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस विभागाने रँलीमध्ये उपस्थिती राहुन जनजागृती केली.
सिकलसेल रोग हा एक अनुवांशिक विकार आहे.ज्यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशी विकृत होतात.यामुळे शरीरातील या पेशी लवकर नष्ट होतात आणि त्यामुळे शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण होते.यामुळे, रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह देखील थांबू शकतो.या पेशी सामान्यतः गोल आकाराच्या असतात,परंतु सिकलसेल रोग असलेल्या लोकांमध्ये त्यांचा आकार सामान्य गोल आकाराऐवजी अर्धचंद्राच्या किंवा ‘सिकल’ आकाराचा बनत असतो.या आजाराचे संपूर्ण उपचार नाही पण नियंत्रण मात्र शक्य आहे.भावी पिढी सिकलसेल निर्माण होवु नये यासाठी लग्नापुर्वी दोघांनी सिकलसेल तपासणी करुनच विवाह करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक गरोदर मातेने सिकलसेल चाचणी करावी.तरी जिल्ह्यातील नवयुवकांनी आवर्जून पुढे येऊन सिकलसेल बाबत सोल्युबिलिटी तपासणी करावी असे आवाहन डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी गांधी पुतळा चौक येथे रँली दरम्यान केले आहे.