
जलसंवर्धनासाठी जलताराची आजची कृती, उद्याचं भवितव्य सुरक्षित करेल-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.
बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
जलताऱ्यांतून उगवतेय भविष्याची आशा
वाशिम, दि.२२ जून-पाण्याचा एक थेंब वाचवणं म्हणजे भविष्याची एक आशा जपणं!वाढती जलटंचाई, कोरडी होत चाललेली भूजल पातळी आणि बदलत्या हवामानाच्या संकटात वाशिम जिल्ह्याने एक सकारात्मक आणि सामूहिक कृतीची दिशा स्वीकारली— ती म्हणजे वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५.
ही स्पर्धा एक चळवळ ठरली — श्रमदानातून साकारलेली, लोकसहभागातून उभी राहिलेली आणि पर्यावरणप्रेमातून वाढलेली.गावकऱ्यांनी हातात फावडे घेतले आणि जमिनीला दिला नवजीवनाचा श्वास.तिथं केवळ जलतारे तयार झाले नाहीत, तर निर्माण झाली उमेद, एकजूट आणि जलजागरूकतेची नवी ओळख.
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी दाखवलेला उत्साह, बांधिलकी आणि जलप्रेम पाहून मन भरून येते. ‘वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा’ ही केवळ प्रशासन पुरस्कृत स्पर्धा नाही तर ही लोकशक्तीचा जागर आहे. गावकऱ्यांनी जेव्हा जलतारे खोदले, तेव्हा त्यांनी केवळ मातीच हलवली नाही तर भविष्यासाठी आशा रुजवली. ही चळवळ प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांना एका ध्येयाने एकत्र आणणारी ठरली आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.
भूजल संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेल्या ‘वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५’ चा बक्षीस वितरण समारंभ वाटाणे लॉन, वाशिम येथे आज दि.२१ जुन रोजी उत्साहात पार पडला.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार किरणराव सरनाईक, आमदार श्याम खोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आकाश वर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, प्रकल्प संचालक अनिसा महाबळे , जलताराचे जनक डॉ. पुरुषोत्तम वायाळ, समता फाउंडेशनचे उत्तमचंद बगडिया, तिफनचे फाउंडेशनचे श्री. देशमुख, समाजसेवक मारशेटवार गुरुजी, श्री. वेदमुथा, कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिमचे माधवराव काकडे, मानोरा येथील भुजंगराव राठोड, कारंजा येथील भालचंद्र जाधव, ब्रह्मकुमारी स्वाती दिदी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संचालक डॉ.हरिष बाहेती, डॉ.सरोज बाहेती, सुभाषराव नानोटे, माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष चौधरी , सामाजिक कार्यकर्ते राजु पाटील राजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक जनुना खुर्द, द्वितीय क्रमांक मालेगाव तालुक्यातील कोळदरा तर तृतीय क्रमांक रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द या गावांना मिळाला.
या कार्यक्रमाची सुरुवात अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना व अरण्यरुषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरीष बाहेती यांनी केले. वाशिम जिल्हा अॅसपिरेशनलमधून इन्सपिरेशनलकडे वाटचाल करत आहे. जलसाक्षरता हीच खरी दिशा आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.पुढे म्हणाल्या,’अॅसपिरेशनल टू इन्सपिरेशनल’ ही संकल्पना कृतीतून उमटावी आणि वाशिम जिल्हा त्या दिशेने चालला आहे, याचा मला अभिमान आहे.या कामात योगदान देणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.स्पर्धेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील २४ गावांची निवड करून दि. १४ जून रोजी परीक्षण करण्यात आले होते.
त्यात तालुकास्तरीय स्पर्धेत वाशिम तालुक्यातील तामसाळा ग्रामपंचायतीने १४०० जलताऱ्यांची निर्मिती करत प्रथम क्रमांक, कोंडाळा झामरे द्वितीय, तर तृतीय क्रमांक नागठाणा ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला.
रिसोड तालुक्यातील स्पर्धेत प्रथम क्रमांक कंकरवाडी , द्वितीय क्रमांक घोटा, तृतीय गोहगाव,
मानोरा तालुक्यात प्रथम क्रमांक वसंत नगर, व्दितीय क्रमांक ढोणी , तृतीय क्रमांक तळप बु ,
मालेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक ईरळा, व्दितीय क्रमांक आमखेडा, तृतीय क्रमांक जऊळका
मंगरूळपीर तालुक्यात प्रथम क्रमांक नागी, व्दितीय क्रमांक अंबापूर, तृतीय क्रमांक गोलवाडी
कारंजा तालुक्यात प्रथम क्रमांक गायवळ, व्दितीय क्रमांक लाडेगाव, तृतीय क्रमांक मुरब्बी, तर कम्पो रिचार्ज पिट स्पर्धेतील १२ शेतकऱ्यांना लकी ड्रॉद्वारे स्मार्ट पेरणी यंत्रांचे वितरण करण्यात आले.उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी यंत्र वितरणाच्या पार्श्वभूमीची माहिती देत सांगितले की, शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. स्मार्ट पेरणी यंत्र शेतकऱ्यांचे श्रम आणि पाणी वाचवते.
कार्यक्रमात अविनाश मारशेटवार व डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त करत,गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हीच या स्पर्धेची खरी यशकथा आहे, असे सांगितले.या उपक्रमाचे प्रायोजक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग, बीजेएस, पाणी फाउंडेशन, रेडिओ वत्सगुल्म, समता फाउंडेशन, श्री फाउंडेशन, तिफन फाउंडेशन, सर्वधर्म मित्र मंडळ,स्वामी विवेकानंद शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ, माहेश्वरी संघटना व ब्रदर्स संघटना आदींचे योगदान लाभले.
यादरम्यान जियो टॅगींग मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वाटर हिरोजचांही प्रातिनिधिक स्वरूपात यथोचित सन्मान करण्यात आला.वत्सगुल्म स्पर्धा ही केवळ स्पर्धा न राहता जिल्ह्यातील जलचळवळीचे प्रबळ उदाहरण बनली आहे, असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले.सूत्रसंचालन निलेश सोमाणी, इरफान सय्यद व डॉ. काळे यांनी केले.कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार उपजिल्हाधिकारी कैलास देवरे व निलेश सोमाणी यांनी मानले.