
गोंदिया, दि.०५- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी काल शुक्रवारी (दि.०४) आमगाव तालुक्यातील बाम्हणी गावातील शेतशिवाराला भेट दिली.
मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस सी अवताडे, कार्यक्रम समन्वयक मिथून भगत कार्यक्रम अधिकारी कमलेश चव्हाण सहप्रमुख सुयोग उराडे यांचे मार्गदर्शनाखाली हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सध्या आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन आदी विषयांवर शेतकऱ्यांना सल्ला व मार्गदर्शन करीत आहेत
.याचाच एक भाग म्हणून कृषिमहाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी भदाडे, तेजस्विनी बिसेन, सुहानी भुसारी, विशाखा आंबेडारे, वैदवी भरणे यांनी बाम्हणी येथील शेतकरी कालिचरण भिमटे यांच्या शेतशिवारास भेट दिली. या भेटीत या विद्यार्थिनिंनी त्यांच्या शेतातील शेततळ्याची पाहणी केली. यावेळी श्री भिमटे यांना या विद्यार्थिनींनी जलसिंचनासाठी शेततळे कसे उपयुक्त आहे, ते पटवून देत जलव्यवस्थापनाविषयी त्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी श्री भिमटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना या विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे शंका समाधान केले. याशिवाय यावेळी त्या विद्यार्थ्यांनी शेतीविषयक माहिती, पर्यावरणाचे महत्व, जैविक तंत्रज्ञान, शेतीचे आधुनिक प्रकार आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.