
गोंदिया -राज्य शासनाच्या दारू विक्रीवरील करवाढ धोरणाविरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम बार व हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत १४ जुलै रोजी राज्यव्यापी बंदची घोषणा केली होती. दारूवरील वॅटमध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात १५ टक्केची वाढ तसेच उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. याच पार्श्वभूमीवर आहार संघटना मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या पुढाकाराने हे आंदोलन हाती घेण्यात आले होते. या बंदला गोंदिया जिल्ह्यातील बीअर बार, परमिट रूम असोसिएशनने पूर्ण पाठिंबा दर्शविला होता व संपूर्ण जिल्ह्यातील परमिट रूम, बार तसेच वाइन शॉप कडकडीत बंद राहिले.
सोमवारी (दि. १४) बार चालकांनी कडकडीत बंद ठेवून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाच्या करवाढीचा निषेध करीत मोर्चा काढून जिल्हाधिकारी गोंदिया यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनातून राज्य शासनाने लाभलेली आर्थिक करवाढ परवडणारी नसून त्यामुळे अनेक बार बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे हजारो कामगार बेरोजगार होतील. शासनाने त्वरित निर्णय मागे घ्यावा; अन्यथा, व्यापक आंदोलन छेडले जाईल. या बंदमुळे जिल्ह्यातील सर्व बार, बीअर शॉपी, परमिट रूम व वाइन शॉप यामध्ये सोमवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात गोंदिया जिल्हा असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सर्व तालुक्यांतील पदाधिकारी व बार मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





