
चित्रा कापसे/तिरोडा-शहरातील गावठाण हद्दीतील नागरिकांच्या मालमत्ता हक्कांना अधिकृत मान्यता मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,गोंदिया येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.गावठाण जागेची अचूक मोजणी करून संबंधित लाभार्थ्यांना पट्टे देण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
सदर बैठकीत जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तिरोडा नगर परिषद प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा शहरातील ग्रामस्थांच्या मागण्यांची माहिती प्रशासनास सविस्तरपणे दिली आणि गावठाणातील जुनी घरे, मालमत्ता यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी पट्टे वाटप लवकरात लवकर पूर्ण करावे,अशी मागणी केली.
या प्रक्रियेमुळे शेकडो कुटुंबांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळणार असून त्याचा फायदा बँक कर्ज, शासकीय योजना व विविध लाभ घेण्यासाठी होणार आहे. लवकरच मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.तिरोडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मालमत्ता हक्कासाठी आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांना गती मिळाल्याचे चित्र या बैठकीत दिसून आले.





