
देवरी,दि.३०ःनक्षल दमन विरोधी सप्ताह 2025 अनुशंगाने नक्षली अभियानाला न जुमानता गोरगरीब आदिवासी बांधवाना आरोग्याच्या सुविधा गावपातळीवर मोफत मिळण्याच्या दृष्टीकोनातुन आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या एकत्रित सहकार्याने गोंदिया जिल्ह्यात अतिदुर्गम गावात तपासणी शिबीरे राबविण्यात येत आहे.दि.24 जुलै रोजी सशस्त्र दुरक्षेत्र कॅंप मगरडोह व प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमी यांचे एकत्रित सहकार्याने मगरडोह येथे आरोग्य तपासणी शिबीरातुन 120 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदुर/जमीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी दिली आहे.
मगरडोह येथील आरोग्य तपासणी शिबीरात कार्यक्षेत्रातील लोकांची रक्तदाब,मधुमेह, सिकलसेल,विविध प्रयोगशाळा रक्त तपासणी,हिवताप रक्त नमुने,आरडीके किट ने रक्त तपासणी व समुपदेशन करण्यात आले.
शिबीरा दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे , आरोग्य सहायिका शोभा पडोळे,आरोग्य सेविका साधना डोरले, फार्मासिस्ट मोनिका बहेकार,आरोग्य सेवक सदाशिव अण्णाकडे तसेच आशा सेविका यांनी आरोग्य सेवा दिली.उपस्थितांना वैद्यकिय अधिकारी डॉ.सुरभी गिर्हेपुंजे यांनी सिकलसेल व असंसर्गजन्य आजार जसे रक्तदाब, मधुमेह व कर्करोग विषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे मगरडोहच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक प्रशांत नारखेडे, खेदराज राऊत व त्यांचे पोलीस हवालदार यांनी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीसाठी सहकार्य केले.





