
गोंदिया,दि.०९ः महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.त्या अनुशंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत “अंगदान जीवन संजीवनी”अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदियाच्या वतीने “अंगदान जीवन संजीवनी” अभियानाची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे.शासकीय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्था,शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालये व अशासकीय संस्था व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक “अंगदान जीवन संजीवनी”अभियान अंतर्गत अवयवदान शपथ व जनजागृती करित आहे.
केटीएस रुग्णालयाच्या समुपदेशक भाविका बघेले यांनी दि. 8 ऑगस्ट 2025 रोजी गोंदिया शहरातील ” ओम योगा सेंटर “ येथे अंगदान जनजागृती कार्यक्रम यशस्वी पार पडला.
अंगदान या विषयांवर समाजात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने केटीएस रुग्णालयाचे नेत्रदान सल्लागार भाविका बघेले यांच्या मार्गदर्शनात अंगदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात योगा सेंटरचे सदस्य तसेच नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत अवयवदानाची प्रतिज्ञा व्यक्त केली.
या कार्यक्रमात अंगदानाची संपूर्ण माहिती देण्यात आली.भाविका बघेले यांनी अंगदानाचे महत्त्व, कोणते अवयव दान करता येतात, नेमकी कोणती प्रक्रिया असते, कायदेशीर बाबी, मेंदूमृत (Brain Death) व्यक्तीचे महत्त्व या सर्व गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केले.अनेकांनी ह्या वेळी ऑनलाईन अंगदानासाठी संमती फॉर्म भरून नोंदणी केली.
भाविका बघेले यांनी सांगितले की, “अंगदानाची खरी गरज ही समाजात समजून घेतली पाहिजे.लोकांना योग्य माहिती मिळाली तर अनेकांचे जीवन वाचू शकते.”
कार्यक्रमाचे संयोजन प्रभावी पद्धतीने पार पडण्यासाठी ओम योगा सेंटरचे दिपाली कठाने यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे आयोजन अवयवदान जिल्हा समुपदेशक भाविका बघेले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमात खालील ठळक मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले.
- अंगदान नंतर अनेक जणांना नवे जीवन मिळू शकते हे विविध उदाहरणांद्वारे सांगण्यात आले.
- नेत्रदानाच्या गरजांवर विशेष भर देत, नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते हे विशद करण्यात आले.
- अवयवदानाची ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन देण्यात आले.
- राष्ट्रीय अंगदान संस्था (NOTTO) च्या अधिकृत वेबसाईटचा वापर कसा करायचा, कोणते तपशील भरावे लागतात, आणि नोंदणी नंतर कोणते कागदपत्र आवश्यक असतात, हे सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले.





