
गोंदिया, दि.13 : रानातील भाजी तसेच शेतशिवारात उगवल्या जाणाऱ्या भाज्यांचे आहारातील महत्व व औषधी गुणधर्म, तसेच पौष्टिक तृणधान्याचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना मिळावी यादृष्टीने तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन तालुका कृषि अधिकारी कार्यालय तिरोडा व आत्मा यांच्या वतीने गुरुवारी दि.14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, तालुका विक्री केंद्र, कन्या शाळेच्या समोर, हुतात्मा स्कारकाच्या बाजुला, तिरोडा येथे करण्यात आले आहे.
तालुक्यातील जैवविविधता व रानभाज्या यांचे आकर्षण निसर्गाशी जवळीकता साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. रानभाज्या या केवळ आहार आणि चवीशी निगडीत नसून अनेक औषधी गुणतत्वे रानभाज्यांमध्ये दडलेली आहेत. पिढ्यांपिढ्यापासून यांच्या सेवनाला आपण अधिक महत्व देतो. प्रत्येकापर्यंत हा रानमेवा उपलब्ध होवून पोहचावा व शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी स्टॉलची व्यवस्था केली जात असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी तिरोडा पवन मेश्राम यांनी दिली आहे.
या रानभाजी महोत्सवात केना, कुंजरु, खापरखुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा, तरोटा, मायाळु भाजी, शेवगा, अघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी, तसेच हंगामी फळे ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध असतील. मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्वे व खनिजे आणि औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. सकस आहारामध्ये विविध रानभाज्यांचा व फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. याविषयी या महोत्सवात मार्गदर्शन सुध्दा केले जाणार आहे.या रानभाजी महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी, शेतकरी बांधवांनी व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन शेतकरी गटांना अप्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




