32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News राज्यात पहिल्यांदा महिला बचतगटासाठी गोंदिया जिल्ह्यात आयटीआयमध्ये कोर्सेस सुरु होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यात पहिल्यांदा महिला बचतगटासाठी गोंदिया जिल्ह्यात आयटीआयमध्ये कोर्सेस सुरु होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

0
113

blank

गोंदिया, दि.15 : महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून महिला आत्मनिर्भर होण्याकरीता गोंदिया जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये महिला बचतगटासाठी कोर्सेस सुरु करण्यात येणार, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे आयोजित विभाजन विभिषिका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, दलजितसिंग खालसा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग नागपूरचे उपसंचालक हेमंत आवारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले, देशाच्या फाळणीचा इतिहास हा वेदनादायक आहे. या फाळणीच्यावेळी आपल्या अनेक देशबांधवांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अभिवादन करण्यासाठी विभाजन विभिषिका हा दिवस पाळला जातो असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री महोदयांनी विभाजन विभिषिका बद्दलच्या इतिहासाची विस्तृतपणे माहिती विशद केली.

जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले, यावर्षी ‘हर घर संविधान’ संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आपल्या देशाच्या संविधानाला खुपच महत्व असल्यामुळे विद्यार्थ्यांना याची जाणिव असली पाहिजे. संविधानाचा प्रत्येक विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आपले ध्येय असले पाहिजे. देशाचे नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये संविधानाची अंमलबजावणी केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दलजितसिंग म्हणाले, स्वातंत्र्याची विभाजन विभिषिका यावर आपण चिंतन केले पाहिजे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना असा आपला उद्देश असला पाहिजे. आजच्या नविन पिढीने सुसंस्कृत भारताचे निर्माण केले पाहिजे. जीवनात समरसता फार आवश्यक आहे. आपली जीवनशैली स्वआधारित असली पाहिजे असे त्यांनी सांगितले.यावेळी मंत्री महोदयांनी संस्था व्यवस्थापन समिती (IMC), पंडीत दीनदयाल उपाध्याय हिरक महोत्सव, जिल्हा आयटीआय विभाग, जिल्हा कौशल्य विकास आदी विषयाचा जिल्हा आढावा घेतला.

कार्यक्रमास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भिमराव तुमडाम, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे यांचेसह इतर विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.के.पटले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग नागपूरचे उपसंचालक हेमंत आवारे यांनी मानले.

blank