येरमागड आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दुसरा गंभीर

0
10

berartimes.com गडचिरोली,दि.२६ :: धानोरा तालुक्यातील येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाला असून, दुसऱ्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले आहे. राजमू बुधकर धुर्वे(१४) रा.कटेझरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

राजमू धुर्वे हा येरमागड येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. राजमूच्या पोटात दुखत असल्याने व उलटी होत असल्याने त्याला आज सकाळी मालेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कुरखेडा येथे रेफर केले. कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यास गडचिरोली येथे रेफर करण्यास सांगितले. मात्र गडचिरोलीला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्याच शाळेतील नवव्या वर्गात शिकणारा दुसरा विद्यार्थी अलीराम जयराम तुमरेटी यालाही पोटदुखी व उलटीचा त्रास होत असल्याने त्यालादेखील मोटारसायकलने कुरखेडा येथे उपचारासाठी आणले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला गडचिरोलीला हलविण्यात आले आहे.