पाणीटंचाई निवारण कृती आराखडा मंजूर

0
15

अकोला: जिल्ह्यातील ४५८ गावांसाठी पाणीटंचाई निवारण कृती आराखडा जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी मंजूर केला आहे. पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५८२ उपाययोजनांच्या कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजारांचा खर्च या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने, हिवाळ्याच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजनांचा तयार करण्यात आलेला कृती आराखडा जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या कृती आराखड्यास जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गुरुवारी मंजुरी दिली. पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा समावेश असून, या कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.