28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ खुर्शिपारचे सरपंच हेमलता चव्हाण पायउतार;१०० टक्के नागरिक अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने

खुर्शिपारचे सरपंच हेमलता चव्हाण पायउतार;१०० टक्के नागरिक अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने

0
154

भ्रष्टाचार, मनमानी कारभाराला घेवून अविश्वास
आमगाव : तालुक्यातील खुर्शिपार ग्राम पंचायतीमध्ये सरपंचाचा भ्रष्ट व मनमानी कारभाराला घेवून असंतोष निर्माण झाला होता. याविरूध्द ग्राम पंचायतचे पदाधिकारी व गावकर्‍यांनी एकवटून अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय झाला असून नाट्यमय राजकीय उलथापालथनंतर अखेर सरपंच हेमलता चव्हाण यांच्याविरूध्द सादर करण्यात आलेले अविश्वास प्रस्ताव एकमताने पारीत करण्यात आले. यामुळे सरपंच चव्हाण यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
तालुक्यातील खुर्शिपार ग्राम पंचायतीत सरपंच हेमलता चव्हाण यांचा मनमर्जी कारभार सुरू होता. ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच आपल्याच मनमर्जीने गावात कारभार चालवित असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला होता. शिवाय शासनाकडून ग्राम पंचायतीला मिळणार्‍या निधीही सरपंच आपल्या मर्जीने खर्च करीत असे. शासकीय जमिनीचे अनधिकृत प्लॉटिंग करून आर्थिक व्यवहार करणे, विकासकामांत सदस्यांना डावलणे आणि गावकर्‍यांना कामासाठी पैशांची मागणी करणे, असे गंभीर आरोप ग्रामसभेत चर्चिले गेले. इतकेच नव्हे तर, विरोधात बोलणार्‍यांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची भीती दाखवणे आणि वकिली पेशाचा धाक दाखवून धमकावण्याचे प्रकार घडल्याने गावकर्‍यांमध्ये संतापाची लाट होती. या प्रकाराला घेवून ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत १९ जानेवारी रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. यावर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार २८ जानेवारी रोजी आमगाव तहसीलदारांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सरपंच हेमलता चव्हाण यांच्या भवितव्याचा पैâसला होणार होता. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सभेला गावकर्‍यांची मोठी गर्दी केली. दरम्यान मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यावर एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. उपस्थित सर्व ६६० मतदारांनी हात उंचावून सरपंचांच्या विरोधात कौल दिला. चव्हाण यांच्या समर्थनार्थ एकही हात वर झाला नाही. १०० टक्के मतदान विरोधात गेल्याचे घोषित होताच ग्रामपंचायत परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी दणाणून गेला. गावकर्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलाल उधळत सरपंचावरील अविश्वास प्रस्तावाचे स्वागत केले. अन्यायाविरुद्ध एकत्र आलेल्या ग्रामशक्तीचा आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रशासनाने या निकालाची अधिकृत नोंद घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
……………………
सरपंचाने जनाधर गमावला
तालुक्यातील खुर्शिपार ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरपंच हेमलता चव्हाण यांच्या मनमानी कारभाराला घेवून वातावरण तापले होते. याला घेवून उपसरपंचासह इतर सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी सभा आयोजित होती. सभेत अविश्वास प्रस्ताव पारीत होत असताना सरपंच हेमलता चव्हाण यांच्या बाजुने एकही मत पडले नाही. १०० टक्के नागरिक अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने राहिले. ६६० मतदारांनी एकमुखाने सरपंचांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांचे सरपंचपद संपुष्टात आले आहे. ‘शून्य’ मते पदरात पडल्याने सरपंचांचा जनाधार पूर्णपणे गमावल्याची चर्चा होती.

blank