36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ कान्होलीतील महिलांचा मद्यविक्री केंद्राला तीव्र विरोध;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कान्होलीतील महिलांचा मद्यविक्री केंद्राला तीव्र विरोध;जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
46

blank

अर्जुनी मोरगाव : ग्रामपंचायत कान्होली अंतर्गत धाबे टेकडी परिसरात नव्याने मंजूर करण्यात आलेल्या बिअर बार / मद्यविक्री परवान्याविरोधात कानोली व परिसरातील महिलांनी एकमुखी आवाज उठवित आज गोंदिया येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सदर परवाना तात्काळ रद्द करून दुकान सुरू होण्यापासून थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिलांच्या निवेदनानुसार, धाबे टेकडी, जब्बारखेडा व सोनार कान्होली परिसरात मद्यविक्री केंद्रास मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित दुकान अद्याप सुरू झाले नसले तरी लवकरच सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे समजताच महिलांनी संघटित पवित्रा घेत प्रशासनाकडे धाव घेतली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागात मद्यविक्रीमुळे घरगुती अत्याचार, कुटुंबातील वाद, आर्थिक उत्पन्नाची नासाडी, मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीती आहे. शासनाच्या दारूबंदी व व्यसनमुक्ती धोरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचा ठराव व महिलांचा विरोध विचारात घेणे आवश्यक असल्याचे महिलांनी स्पष्ट केले.
या संदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद असून त्याची प्रत प्रशासनास सादर करण्यात आली आहे. संबंधित परवाना रद्द न केल्यास महिलांकडून लोकशाही मार्गाने आंदोलन, मोर्चा व उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सदर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी कान्होली व परिसरातील महिला ग्रामस्थांनी केली आहे.निवेदन देतेवेळी छाया अमले, हेमलता गावळ,विरेखा वल्के, कल्पना राखडे, कविता कोरेटी, शालिनी वाढई, अनिता राहिले, अंजली पुराम, वर्षा कुंभरे, मीनाक्षी अमले, यशोदा गोटे, सुनीता रहिले, मंदा उरकुडे व अन्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

blank