
गुढरी येथील अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण उत्साहात
अर्जुनी-मोर.-नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा गुढरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण दि. १३ फेब्रुवारी रोजी जि.प. सदस्या रचनाताई गहाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना रचनाताई गहाणे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी ही पहिली शाळा आहे. नव्या इमारतीमुळे मुलांच्या शिक्षण, पोषण व आरोग्य विषयक सुविधा अधिक सक्षम होतील. महिलांचे सक्षमीकरण आणि बालविकासासाठी शासन कटिबद्ध असून, भविष्यातही अशा सुविधा अधिक वाढविण्यात येतील.”
लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या पुष्पलता दृगकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच विवेक डोंगरे, उपसरपंच सुवर्णाताई सरोते, पोलीस पाटील मोनिकाताई दोनोडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका वर्षाताई पुस्तोडे, ग्रामपंचायत सदस्य श्रुतीकाताई बहेकार, किरणताई रामटेके, ग्रामपंचायत अधिकारी सुनील सोनवाणे, रतिराम कापगते, चंद्रभान बनसोड, हेमराज फुंडे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष चिमणकरजी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज रामटेके, आशा सेविका दीपलता फुंडे, सत्यजित रामटेके, ज्योत्सना कोरे, शिल्पाताई बनसोड, दिपेंद्र बोरकर तसेच बोंडगावदेवी सर्कलमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन एस. आर. नंदरधने यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज रामटेके यांनी मानले.या लोकार्पण सोहळ्यामुळे गुढरी गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला नवे बळ मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.





