38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ रस्ता तयार करताना प्रशासनाला वळण मार्गाचा विसर

रस्ता तयार करताना प्रशासनाला वळण मार्गाचा विसर

0
154

blank

तिरोडा: तालुक्यातील परसवाडा ते बोरा या रस्त्याची तीन तेरा वाजले होते. रस्त्यावरील खड़े अपघाताला आमंत्रण देत असल्याने नागरिकांनी अनेकदा तक्रार करून रस्ता दुरूस्तीची मागणी केली. यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनही केले. त्यातच जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने परसवाडा-बोरा मार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे. या मार्गावर असलेल्या पुलाचे नुतनीकरण केले जात आहे. यासाठी विभाग व कंत्राटदाराकडून रस्ता बंद करण्यात आला. परंतु, पर्यायी रस्ता तयार करून देण्यात आला नाही. यामुळे शेतकरी, नागरीक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. या प्रकाराने प्रशासनाला वळण मार्गाचा विसर पडला का? अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, रस्ता बांधकाम करताना वळण मार्गाचा पर्याय असतो. त्यासाठीही निधी मंजूर केला जातो. मात्र सदर मार्गाचे काम होताना वळण मार्ग तयार करण्यात आला नसल्याने अंदाज पत्रकावर गावकऱ्याकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
तिरोडा परसवाडा-बोरा तालुक्यातील हा मार्ग परिसरातील अनेक गावांसाठी वर्दळीचा प्रमुख रस्ता आहे. सोनेगाव, डब्बेटोला, बोरा येथील नागरिक तथा विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासह इतर कामाकरिता ये-जा करावी लागते. मात्र हा रस्ता खड्डेमय झाल्याने परिसरातील गावातील नागरिकांची वहिवाट खडतर झाली होती. खड्डयातून वाट काढून नागरिकांना रहदारी करणे भाग पडत होते. दरम्यान परसवाडा, बोरा येथील नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारपूर्ण विनंती करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. यासाठी आंदोलन देखील केले. दिर्घ प्रतिक्षेनंतर अखेर विभागाला जाग आली. साबां विभागाकडून रस्ता बांधकामाचा मुहूर्त काढण्यात आला. त्यानुरूप कामाला सुरूवात झाली असून या मार्गावरील पुलाचे नुतनीकरण केले जात असल्याने कंत्राटदाराने रस्ता बंद केला. रस्ता बंद करताना वर्दळ बाधित होवू नये, याकरीता पर्यायी (वळण मार्ग) तयार करणे बंधनकारक असते. यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते. परंतु, कंत्राटदाराने वळण मार्ग तयार न करताच रस्ता बंद केल्याने परिसरातील गावातील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे शेतकरी, नागरीक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली असून दूरअंतर कापून प्रवास करणे भाग पडत आहे. या प्रकारामुळे साबां विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अंदाजपत्रक तयार करताना अधिकाऱ्यांना वळण मार्गाचा विसर पडला का? असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे वळण मार्ग तयार न करताच निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी सोयीस्कर आखलेला डाव असल्याची शंकाही गावकरी व्यक्त करु लागले आहेत. चौकशी करून त्वरित वळण मार्ग तयार करून देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

blank