
गोंदिया,दि.२२– राष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात गोंदिया जिल्ह्याने वर्ष 2025-26 मध्ये पुन्हा एकदा भरारी घेत क्षयरोग नियत्रंण कार्यक्रम प्रभाविपणे राबवत राज्यात नावलौकीक प्राप्त करुन व्दितीय स्थान पटकाविले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याचे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशकानुसार क्षयरोग कार्यक्रम मध्ये केलेल्या कामानुसार रैंकिंग केले जाते.
राज्य शासनाच्या व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.22 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी गोंदिया क्षयरोग विभागाला महाआरोग्य सन्मान 2026 पुरस्काराने सन्मानित आरोग्य मंत्री प्रकाश आबिंटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या नेतृत्वात तब्बल 14 विविध ईंडीकेटरनुसार क्षयरोग कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांच्या नेतृत्वात जिल्हा क्षयरोग विभागाने उत्क्रृष्ट सांघिक कार्य व गाव पातळीवर केलेले सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर राज्यात द्वितीय स्थान पटकविण्याचा बहुमान जिल्ह्याने प्राप्त केले.
उपलब्ध साधन सामुग्री व मनुष्यबळात त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट आरोग्य सेवेबद्दल जिल्हाधिकारी प्रजित नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम,जि.प.अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर,उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व त्यांचे टिमचे अभिनंदन केले आहे.





