विधान परिषद निवडणूक : संशयित रोख व्यवहारावर आयकर विभागाची नजर- जिल्हाधिकारी

0
16

* सोशल मिडीयावर सायबर सेलची नजर
* परवानागीसाठी एक खिडकी योजना
* आचार संहितेची कोटेकोर अंमलबजावणी
गोंदिया, दि.24 : भंडारा – गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून संशयीत रोख व्यवहार व बँक व्यवहारावर आयकर विभागाची नजर असणार आहे. निवडणुकीच्या संबंधीत असलेल्या व्यक्तींनी कुठल्याही माध्यमातून केलेले बँक व्यवहार तसेच परदेशवाऱ्या व सहली यावर प्रशासनाची करडी नजर राहणार असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत गोंदिया जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, भंडारा मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.अहीरे,गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर व उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे उपस्थित होते.
विधान परिषदेसाठी भंडारा- गोंदिया जिल्हयाच्या ग्रामीण व शहरी भागात आचारसंहिता लागू असून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्हयात भरारी पथक स्थापन करण्यात आले असून तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. अवैध दारु विक्री व डेली स्टॉक नियंत्रीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोशल मिडीयावरील प्रचारावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
विधान परिषद निवडणुकीशी संबंधीत संशयीत बँक व्यवहार व परदेशवाऱ्या यावर आयकर विभागामार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मोठे तसेच रोखीचे बँक व्यवहार आयकर विभागाच्या संशयाच्या टप्प्यात असणार आहेत. अशा व्यवहाराची शंका असल्यास पुराव्यानिशी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. निवडणुकीसाठी लागणा-या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार आहे. बॅनर, पोस्टर व जाहिराती तात्काळ काढण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी व खंड विकास अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान नवीन कामांच्या निविदा प्रकाशित करणे, प्रशासकीय मान्यता देणे किंवा भूमीपूजन करणे यावर प्रतिबंध असणार आहे. भंडारा-गोंदिया प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून 26 ऑक्टोबर 2016 अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2016 आहे. 3 नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर आहे. 19 नोव्हेंबर 2016 रोजी मतदान घेण्यात येईल तर 22 नोव्हेंबर 2016 रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या 393 एवढी आहे. यात जिल्हा परिषद भंडारा 59, नगर परिषद भंडारा -35, नगर परिषद तुमसर-25, नगर परिषद पवनी-19, नगर पंचायत मोहाडी-19, नगर पंचायत लाखनी- 19, नगर पंचायत लाखांदूर-19 असे भंडारा जिल्हयातील 195 व गोंदिया जिल्हयातील- जिल्हा परिषद गोंदिया-59. नगर परिषद गोंदिया -44, नगर परिषद तिरोडा-19, नगर पंचायत गोरेगांव -19, नगर पंचायत सडकअर्जुनी -19, नगर पंचायत देवरी-19 व नगर पंचायत अर्जुनी/मोर- 19 असे एकूण 198 स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्हयात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्हयात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी व मनोहर नगर परिषद हायस्कुल गोंदिया असे 4 प्रारुप मतदान केंद्र असणार आहेत. भंडारा- गोंदिया स्थानिक मतदार संघ निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल. तर मतमोजणी 22 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 वाजतापासून करण्यात येईल. मतपेटया ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे स्ट्राँगरुम निश्चित करण्यात आली आहे.
21 ऑक्टोबर 2016 रोजीच प्रारुप मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्यात आली असून प्रारुप मतदान केंद्राच्या यादीवर 28 ऑक्टोबर 2016 पर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. राजकीय पक्षांना प्रचार, वाहन व सभेसाठी परवानगी देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा व गोंदिया असे एक-एक पथक नेमण्यात आले आहे. भंडारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देण्यात येणार आहे.
भंडारा – गोंदिया जिल्हयात आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. आदर्श आचारसंहितेचा भंग करणा-यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीस भंडारा- गोंदिया जिल्हयातील अधिकारी उपस्थित होते.