26.4 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home विदर्भ ‘इंद्रावती’वरील आंतरराज्यीय पूल ठरणार विकास मार्गावरचा नवा सेतू

‘इंद्रावती’वरील आंतरराज्यीय पूल ठरणार विकास मार्गावरचा नवा सेतू

0
39

गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या इंद्रावती नदीवर तब्बल 750 मीटर लांबीचा पूल तयार होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत उभारल्या जात असलेला हा अतिदुर्गम भागातील पूल अविकसित भागाच्या विकासमार्गावरील नवा सेतू ठरणार आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नव्याने रुजू झालेल्या 42 स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांनी मंगळवारी केलेल्या अभ्यास दौऱ्यात या पुलाच्या कामाचे अवलोकन करत नोंदी घेतल्या.

डावी-कडवी विचारसरणीग्रस्त भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या विशेष निधीतून इंद्रावती नदीवरील या आंतरराज्यीय पुलाची उभारणी केली जात आहे. 42 कोटी रुपये किमतीच्या या पुलामुळे दामरंचाकडून छत्तीसगडला जोडणाऱ्या मार्गावरील प्रवास सुकर होणार आहे. या पुलाचे काम पुढच्या वर्षी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी सांगितले.

यासोबतच बांडिया नदीवर दोन पूल उभारले जात आहेत. त्यातील एका पुलामुळे कमलापूर ते दामरंचा या दरम्यानचे अंतर 70 ते 80 किलोमीटरने कमी होणार आहे. याशिवाय बांडिया नदीवर सुरजागडजवळ उभारल्या जात असलेला नवीन पूल सुरजागडमधील लोहखनिज वाहतुकीच्या दृष्टिने महत्वाचा ठरणार आहे. या दोन्ही पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.

काही वर्षात बदलले चित्र

अभियांत्रिकी सहायकांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून कामांचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी त्यांना मंगळवारी अभ्यास दौरा घडविण्यात आला. इंद्रावती नदीवरील छत्तीसगडला जोडणारा हा पूल तांत्रिकदृष्ट्या इतर पुलांपेक्षा वेगळा आहे. विशेष म्हणजे पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्या अतिसंवेदनशिल ठिकाणी भेट देताना पोलिसांची परवानगी काढावी लागत होती. पोलीस संरक्षणात भेट देऊन अवघ्या अर्ध्या तासात तेथून परत निघावे लागत होते. पण आता पोलिसांनी त्या भागातील चित्र बदलविल्यामुळे आज त्या ठिकाणी बिनधास्तपणे जाणे शक्य झाल्याचे अधीक्षक अभियंता निता ठाकरे म्हणाल्या.

अभियांत्रिकी सहायकांना प्रशिक्षण

सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून रुजू झालेल्या 42 जणांना सध्या 10 आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी गडचिरोलीला पाठविण्यात आले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध तज्ज्ञ, सहसचिव, पुल तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. मंगळवारी त्यांनी कामांचे प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील दुर्गम भागातील बांधकामांना भेटी देऊन अवलोकन केले. यावेळी आलापल्लीचे कार्यकारी अभियंता रोहीत रव्वा यांच्यासह इतर कनिष्ठ अधिकारी, कंत्राटदार उपस्थित होते.