गोंदिया, दि.15 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे.स्पर्धेचा विषय “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” असा असून मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क आदी मुद्द्यांवर आधारित निबंध अपेक्षित आहे.
स्पर्धा मराठी भाषेत होणार असून दोन गटांमध्ये विभागण्यात आली आहे. गट क्र. १ मध्ये आयटीआय/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी तसेच बायफोकल व एमसीव्हीसी विद्यार्थ्यांसाठी ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. गट क्र. २ खुल्या गटासाठी असून पुरुष व महिला सहभागींसाठी ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निबंध मूळ (सत्यप्रत) असणे आवश्यक असून कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा.
निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल; मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपात करणे बंधनकारक आहे. हस्तलिखित निबंध QR कोड स्कॅन करून किंवा टंकलिखित निबंध दिलेल्या लिंकवर अपलोड करावा. तसेच पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, शाळा/महाविद्यालय/आयटीआयचे नाव व पूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.
निबंधांचे मूल्यांकन मांडणी, भाषा, मौलिकता, दृष्टिकोन आणि सर्जनशीलता या निकषांवर करण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रु. ३१,०००/-, द्वितीय क्रमांकासाठी रु. २१,०००/- आणि तृतीय क्रमांकासाठी रु. ११,०००/- इतके पारितोषिक तसेच स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल अधिकृत माध्यमातून जाहीर करण्यात येईल. आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. अपूर्ण निबंध ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथे दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२९९१५० किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा, सर्व स्पर्धकांनी आपले निबंध सोमवार २० एप्रिल २०२६ या पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. रा. ना. माटे यांनी केले आहे.





