गोंदिया (१५ एप्रिल) : “मी प्रथमत: आणि अंतिमृत: भारतीय आहे,” हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महान संदेश केवळ फलकांवर न राहता, आज गोंदियाच्या रस्त्या-रस्त्यावर ‘राष्ट्रीय तिरंगा रॅली’च्या रूपाने जिवंत झाला. ‘राष्ट्र चेतना प्रेरणा मंच’ (आर सी पी एम) च्या वतीने आयोजित या भव्य रॅलीने पारंपारिक मिरवणुकींचा साचा मोडून काढत, ज्ञानाच्या आणि संविधानिक मूल्यांच्या एका नव्या युगाची नांदी गायली आहे.‘राष्ट्र चेतना प्रेरणा मंच’ने या सर्व कुप्रथांचे दहन करून ज्ञानाची विचारधारा, मानवता आणि सामाजिक न्यायाला अग्रस्थान दिले. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता कुडवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह ही रॅली निघाली, तेव्हा अवघी नगरी राष्ट्रप्रेमाने भारावून गेली होती.या रॅलीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हातामध्ये डौलाने फडकणारा ‘तिरंगा’ आणि पांढऱ्या शुभ्र वेशभूषेतील शिस्तबद्ध जनसमुदाय. बाबासाहेबांना एका विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकवणाऱ्या प्रवृत्तींना या रॅलीने चपराक दिली आहे. शहरात दिसणारा उत्साह आणि प्रत्येकाच्या हाती असलेला राष्ट्रध्वज हे सिद्ध करत होता की, बाबासाहेब हे केवळ भारताचे नव्हे, तर ‘जागतिक विश्वरत्न’ आहेत.
शहरातील मुख्य मार्गावरून भ्रमण करत ही रॅली दुपारी १२.३० वाजता जयस्तंभ चौकातील प्रशासकीय इमारतीसमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी विसर्जित झाली. येथे उपस्थित मान्यवरांनी महामानवाच्या प्रतिमेला अभिवादन केले. एका विशिष्ट कोषातून बाहेर पडून जागतिक पातळीवर चिंतन होईल, अशा पद्धतीने या सृजनाचा सोहळा पार पडला.राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेची रखवाली करणारी ही तिरंगा रॅली भविष्यात देशातील प्रत्येक शहरासाठी दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.





