26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात

कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कृषी दिन उत्साहात

0
8

भंडारा, दि. 1 जुलै : कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद भंडारा येथील सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांना आधुनिक शेती, कमी पावसातील पीक नियोजन आणि कृषी तंत्रज्ञानाची माहिती देत कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती एकनाथ फेंडर होते. उद्घाटन अर्थ व आरोग्य समितीचे सभापती आनंद मलेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बांधकाम व शिक्षण समितीचे सभापती नरेश ईश्वरकर, कृषी समिती सदस्या पुजाताई हजारे, जिल्हा परिषद सदस्या लताताई नरुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने, प्रकल्प संचालक (आत्मा) उर्मिला चिखले, स्मार्टचे नोडल अधिकारी सचिन खैरनार तसेच जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. व्ही. ए. गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जिल्हास्तरीय खरीप पीक स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त शेतकरी एकनाथ शेंडे, शास्त्री गोमासे, देवराम फंदे, शिवलाल कोरचे, प्रकाश मडावी आणि अनुरूप उईके यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात कृषी विकास अधिकारी व्ही. यू. सोनवणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना आणि कृषी दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी कमी पावसाच्या परिस्थितीतही नियोजनबद्ध शेतीद्वारे उत्पादनवाढ शक्य असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील वरिष्ठ भात पैदासकार डॉ. मिलिंद पी. मेश्राम यांनी कमी पावसात येणाऱ्या भात वाणांची माहिती दिली, तर वरिष्ठ शास्त्रज्ञ उषा डोंगरवार यांनी बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करण्याचे आवाहन केले. प्रगतशील शेतकरी देवराम फंदे यांनी भात पिकाचे उत्पादन वाढविण्याबाबत अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एस. आर. शेलार यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. एस. लांजेवार यांनी केले. कृषी विभाग, जिल्हा परिषद भंडारा तसेच पंचायत समिती भंडारा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.