26.4 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ रुग्णवाहिकेतच गर्भवतीची प्रसूती, गोंडस मुलीला दिला जन्म

रुग्णवाहिकेतच गर्भवतीची प्रसूती, गोंडस मुलीला दिला जन्म

0
9

अर्जुनी मोरगाव : प्रसूतीच्या प्रसववेदना होत असताना बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रात भरती झाली. परंतु प्रसूती जोखमीची असल्याने क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून गर्भवतीला गोंदियाला रेफर करण्यात १०८ आले. नवेगावबांध ते कोहमारा मार्गावर गर्भवतीला तीव्र वेदना सुरू झाल्या. समयसूचकता बाळगून डॉ. ज्ञानेश्वर कापगते यांनी सहकाऱ्यांसह सुरक्षित स्थळी रुग्णवाहिका थांबवून सर्वांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती केली. त्या गर्भवतीने गोंडस मुलीला जन्म दिला. ही घटना ६ जुलै रोजी तालुक्यातील नवेगावबांध-कोहमारा मार्गावर घडली.
स्वाती चांगदेव नेवारे, रा. विहीरगाव (पोटगाव), जिल्हा गडचिरोली, असे गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विहीरगाव (पोटगाव) येथील रहिवासी असलेली स्वाती नेवारे दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी तालुक्यातील देवलगाव नवेगावबांध येथे आली होती. बाळंतपणाच्या वेदना सुरू होताच तिला शासकीय रुग्णालयात ६ जुलै रोजी भरती करण्यात आले होते. प्रसूती अतिजोखमीची असल्याने रुग्णवाहिका बोलावून तिला गोंदियाला रेफर करण्यात आले. परंतु नवेगावबांधची सीमा पार केल्यानंतर त्या गर्भवतीला प्रसववेदना सुरू झाल्या. तीव्र वेदना जाणवू लागल्याने डॉ. ज्ञानेश्वर कापगते यांनी आशा कार्यकर्ती व रुग्णवाहिकेच्या सहकार्याने रुग्णवाहिकेत यशस्वीपणे प्रसूती केली. त्या गर्भवती मातेने गोंडस मुलीला जन्म देताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

रुग्णालयात उपचार सुरू
रुग्णवाहिकेत प्रसूती झाल्यानंतर बाळंतीण व नवजात बाळाला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करून त्वरित उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे योग्य उपचार न मिळाल्याने गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात माता आणि बाळाला दाखल करण्यात आले. नवजात बालक सुखरूप आहे.