26.4 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हयात खासगी बसेसवर कारवाई,आरटीओची मोहीम

गोंदिया जिल्हयात खासगी बसेसवर कारवाई,आरटीओची मोहीम

0
3

गोंदिया : खासगी बसेसमुळे एसटी महामंडळ तोट्यात आले असून महामंडळाला नुकसान सहन करावे लागत आहे. उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याने याची परिवहनमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व खासगी बसेसवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयाने गुरुवारी (दि. ९) दिले आहे. तसेच आठ दिवस जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश पाठविलेल्या पत्रात दिले आहे.
गोंदिया जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष गोंदियान मध्यप्रदेश व छत्तीसगड येथे प्रवासी वाहतूक केली जाते. या खासगी बसेस गोंदिया-बालाघाट मार्गावरील मरारटोली परिसरातील मुख्य बसस्थानक, जयस्तंभचौक, कामगार चौक परिसरात थेट बसेस उभ्या करुन प्रवासी वाहून नेतात. गोंदियाहून-मध्यप्रदेशात दररोज प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसची संख्या ४० ते ५० वर आहे. या बसेस थेट बसस्थानकासमोरूनच प्रवासी पळवून नेत असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस रिकाम्या धावत आहेत. परिणामी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. याचीच गांभीर्याने दखल घेत आता परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयाला पत्र देत बसस्थानकाच्या दोनेश मीटर अंतरात खासगी बसेस उभ्या करुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध मार्गावर धडक मोहीम राबवून नियमाचे उल्लघंन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. याच अंतर्गत गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १०) सहा खासगी बसेसवर कारवाई करून दंड ठोठावला आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेस व स्कूल बसेसची धडक तपासणी मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. नियमाचे उल्लघंन करणाऱ्या सहा खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम अधिक व्यापक स्वरुपात राबविली जाणार आहे.
– विलास चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया