खेमेंद्र कटरे, गोंदिया,दि.१२– महिला व बालविकास विभागाच्यावतीने गोंदिया जिल्ह्यात १८ हिरकणी कक्षांसाठी २.२८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. एका कक्षासाठी साधारणत: १२ लाख ६८ हजार रुपये किंमत ठरविण्यात आली. या कामाकरिता ई-निविदा प्रक्रिया न राबविता गोंदियाच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाने ‘जेम’ पोर्टलवरून साहित्य खरेदी केले. ही खरेदी करताना साधारणत:३-४ हजार रुपयांला मिळणारे पलंग १ लाख ४४ हजारांना खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.विशेष म्हणजे हे पलंग देवरी,तिरोडा,अर्जुनी मोरगाव,गोंदिया व गोरेगाव येथील हिरकणी कक्षात परभणी येथील पुरवठादार श्री साई समर्थ यांच्यावतीने लावण्यात आल्याचे पाहणीत आढळून आले.त्यातच संबधित ज्या कार्यालयात हे हिरकणी कक्ष उभारण्यात आले,त्यापैकी एकाही कार्यालयाला अधिकृत ताबा पावती देण्यात आली नसून पुरवठादारांना आवकजावकमध्ये दिलेल्या पत्रालाच महिला व बाल विकास विभाग ताबा पावती ग्राह्य धरत असल्याने विभागाच्या कामकाजावर शंका निर्माण झाली आहे.





