वनविभागाने केली थरारक सुटका, नागरिकांचा जीव भांड्यात!
गोंदिया:गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री चौक आणि पाटबंधारे विभाग परिसरात शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी अचानक एक अस्वल शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र, वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेत मोठ्या शिताफीने या अस्वलाला जेरबंद केले. यामुळे तब्बल दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या थरारावर पडदा पडला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
दोन दिवसांपासून सुरू होता थरार
मिळालेल्या माहितीनुसार, हे अस्वल गेल्या बुधवारपासून शहराच्या विविध भागात भटकत होते. बुधवारी संध्याकाळी आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागील नाल्याजवळ हे अस्वल पहिल्यांदा नागरिकांना दिसले होते. त्यानंतर तेथून हुलकावणी देत या अस्वलाने संजय नगर परिसरातून थेट लघु पाटबंधारे विभागाच्या हद्दीत प्रवेश केला.शुक्रवारी सकाळी शास्त्री चौक आणि पाटबंधारे विभाग परिसरात हे अस्वल पुन्हा एकदा थेट समोर आल्याने परिसरातील नागरिकांची पाचावर धारण बसली. जंगलातील हिंस्र प्राणी शहरात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अस्वलाला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
नागरिकांनी अस्वलाची माहिती तातडीने वनविभागाला दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे बचाव पथक सर्व अत्याधुनिक साधनांसह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाला कोणतीही इजा न पोहोचवता त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पथकासमोर होते. अखेर, सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि नियोजनबद्ध कारवाई करत अस्वलाला पिंजऱ्यात सुरक्षितपणे कैद केले.वनविभागाने पकडलेल्या या अस्वलाला वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात (जंगलात) सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. वनविभागाच्या या तत्पर कामगिरीचे शहरवासियांकडून कौतुक होत आहे.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन: “शहरी किंवा निवासी भागात कोणताही वन्यजीव आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला दगड मारण्याचा किंवा डिवचण्याचा प्रयत्न करू नये. असे करणे स्वतःच्या आणि वन्यजीवाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकते. अशा वेळी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा.”





