भंडारा: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त भंडारा येथे ‘बुवाबाजी विरोधी जाहीर संघर्ष परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यालय भंडारा समोर पार पडलेल्या या परिषदेत समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा आणि ढोंगी बुवाबाजीवर जोरदार प्रहार करण्यात आला.
लिंबू-मिरचीची दोर कापून अनोखे उद्घाटन या परिषदेचे उद्घाटन भंडारा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष सौ. चंद्रकलाताई भोपे यांच्या हस्ती पार पडले. अंधश्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लिंबू-मिरचीची दोर कापून व त्यावर लाथ मारून या कार्यक्रमाचे अनोख्या आणि संदेशात्मक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षल मेश्राम होते, तर राज्य सरचिटणीस विलास निंबोरकर आणि उपक्रम राज्य सहकार्यवाह पी. एम. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
४० संस्थांचे कार्यकर्ते एकवटले संघटनेच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या परिषदेला विविध ४० संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापैकी १२ संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यासपीठावरून आपले मनोगत व्यक्त करत अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.जादूटोणाविरोधी कायद्यावर मार्गदर्शन सत्रादरम्यान, ढोंगी बुवा-बाबा धर्माच्या नावाखाली नागरिकांची कशी फसवणूक करतात, याचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. तसेच ‘जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या परिषदेला चंद्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम गायधने, गणेश पून, व्यंकटराव गायधने, शाहीर कार्तिक मेश्राम, अशोक ठवकर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष सदानंद इलमे, डॉ. संजय मानकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अचल दामले यांनी केले, तर आभार बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी मानले.





