*शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण*
*रानडुकराने जखमी करने ही नित्याचीच बाब*
अनेक शेतकरी जखमी; कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी वनविभागाचे दुर्लक्ष
———————————————————
तिरोडा/चित्रा कापसे —तालुक्यातील धादरी उमरी येथील परिसरात रानडुकरांनी अक्षरशः हौदोस घातला असून रानडुकरांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी नियमीत गंभीर जखमी होत असायाची बाब झाली असुन गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दि.23/8/2026 ला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान शेतावर गेलेल्या महिपाल शेंडे धादरी वय 61 वर्षे व वामन भालाधरे तिरोडा 57 वर्षे दोन व्यक्तींवर रानडुकरांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यापूर्वीही रानडुकरांनी अनेक नागरिक व शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत.विशेषतः 13 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी पिसाळलेल्या रानडुकरांनी सहा जणांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. वारंवार होत असलेल्या या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाबाबत वन विभागाला यापूर्वी अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या परंतु वन विभाग कायम दुर्लक्ष करीत असुन नागरीकांची सुरक्षा ऐरणीवर आहे, आज वन विभागाच्या वतीने वनरक्षक चंद्रकुमार पारधी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 10 कर्मचाऱ्यांनी धादरी उमरी परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबविले,रानडुकरांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले; मात्र बहुतांश रानडुकरे पळून जाण्यात यशस्वी झाली. या कारवाईत केवळ एक रानडुकराचे पिल्लू हाती लागले. त्यालाही वन विभागाने तयार केलेल्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून धान पिकाची फवारणी, डवरणी, निंदणी तसेच इतर शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र रानडुकरांच्या भीतीमुळे अनेक शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, पिकांची पाहणी आणि आवश्यक कामे कशी करावीत, असा गंभीर प्रश्न धादरी उमरी परिसरातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.प्रशांत हुमने यांच्याशी संपर्क केले असता ते प्रतिसाद देत नाही.
मात्र रानडुकरांच्या वाढत्या संख्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहर, गाव, शेत आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा वावर वाढला असून त्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत, तर काही ठिकाणी जीवितहानीही झालेली आहे.
रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून, शासन व वन विभागाने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी धादरी उमरी परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.
गंभीर जखमी झालेल्या दोन्ही व्यक्तींना औषधोपचारासाठी व योग्य तो वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे व यापूर्वी गंभीर जखमी झालेल्यांना योग्य तो मोबदला देण्याचे कारवाई करण्यात आली आहे अशी बतावनी वनविभागाकडुन होत आहे, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही जखमींना अजुन पर्यंत आर्थिक भरपाई मिळाली नाही.वनविभागाने तात्काळ आययोजना केली नाही तर तिव्र आंदोलनाचा इशारा धादरी उमरी वाशीयांनी दिला आहे.





