# मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष; प्रसूती सेवा बंद, २५० पेक्षा अधिक ओपीडी असलेल्या केंद्राच्या स्थलांतराच्या हालचालींना नागरिकांचा तीव्र विरोध
आमगाव |आमगाव शहराच्या मुख्य भागात तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेलगत असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र एकेकाळी उत्कृष्ट रुग्णसेवा, विशेषतः महिलांच्या प्रसूती सेवा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांसाठी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही नावलौकिक मिळवणारे केंद्र म्हणून ओळखले जात होते. उत्कृष्ट आरोग्यसेवेची दखल घेत या केंद्राला ‘आनंदीबाई जोशी पुरस्काराने’ गौरविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, आज याच आरोग्य केंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला आवश्यक मूलभूत सुविधा, इमारतीची दुरुस्ती, मनुष्यबळ आणि आरोग्यविषयक आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याऐवजी प्रशासनाकडून या केंद्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी केंद्रातील आरोग्यसेवा विस्कळीत होत असून, विशेषतः महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली प्रसूती सेवा बंद पडल्याने ग्रामीण व सीमावर्ती भागातील महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जर्जर प्रसूती केंद्रामुळे महिलांची गैरसोय असताना नावीन्य सुविधा नाहीच,प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती विभागाची इमारत जर्जर अवस्थेत झाल्याने प्रसूती सेवा बंद करण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या केंद्रात यापूर्वी परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रसूती सुविधा उपलब्ध होत होत्या. मात्र, आवश्यक दुरुस्ती व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्रसूती सेवा बंद झाल्याने महिलांना इतर ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.
आरोग्य केंद्राची इमारत आणि पायाभूत सुविधा जीर्ण झाल्या असतील, तर त्या दुरुस्त करून आधुनिक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. रुग्णसेवा बंद करणे किंवा केंद्र स्थलांतरित करणे हा पर्याय नसून, आरोग्य केंद्राचे नूतनीकरण व बळकटीकरण करणे हाच योग्य पर्याय आहे, अशी नागरिकांची भूमिका आहे.
या रुग्णालयात दररोज २५० पेक्षा अधिक रुग्णांची उपचारासाठी गर्दी असते.बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, येथील दररोजची ओपीडी २५० पेक्षा अधिक असते. आमगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही तातडीची प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होते.
विशेष म्हणजे हे आरोग्य केंद्र राज्याच्या सीमेलगत असल्याने महाराष्ट्रासोबत छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील सीमावर्ती नागरिकही उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे या केंद्राचे स्थानिक तसेच प्रादेशिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्व अधिक वाढले आहे.
नगरपरिषद विखंडनाच्या अधिसूचनेनंतर बनगाव केंद्राचे महत्त्व अधिक आहे.दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दि. २८ मार्च २०२५ रोजी अधिसूचनेचा मसुदा जाहीर करून आमगाव नगरपरिषद विखंडनाची प्रक्रिया प्रस्तावित केली असून, आमगाव वगळता बनगाव, रिसामा, किडंगीपार, पदमपूर, माल्ही, कुंभारटोली व बिरसी या गावांना पूर्ववत ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याबाबत अधिसूचना काढण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रशासकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील नागरिकांना सक्षम आणि सुलभ प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अथवा स्थलांतरित करण्याऐवजी या केंद्राला अधिक सक्षम करणे, त्याचा विस्तार करणे आणि आधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेषतः बनगाव, रिसामा, किडंगीपार, पदमपूर, माल्ही, कुंभारटोली आणि बिरसी या परिसरातील नागरिकांसाठी बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र भविष्यात अधिक महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरू शकते. त्यामुळे शासनाच्या प्रस्तावित प्रशासकीय पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांचे जाळे मजबूत करण्याऐवजी उपलब्ध आरोग्य केंद्र कमकुवत करणे हा विरोधाभासी निर्णय ठरेल, अशी नागरिकांची भूमिका आहे.
अधिसूचनेचा आधार दाखवून आरोग्यसेवेबाबत वेगळे निर्णय?
नागरिकांचा आरोप आहे की, राज्य शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून संबंधित गावांतील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याऐवजी जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्याच अधिसूचनेचा आधार घेत वेगळे प्रशासकीय निर्णय लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.एकीकडे शासनाच्या अधिसूचनेत प्रशासकीय क्षेत्ररचनेत बदल प्रस्तावित होत असताना, दुसरीकडे त्या परिसरातील नागरिकांना सहज उपलब्ध असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली होत असतील, तर त्याचा थेट परिणाम ग्रामीण व सीमावर्ती नागरिकांच्या आरोग्यसेवेवर होणार आहे.
आरोग्यसेवा बळकट करण्याऐवजी उपलब्ध आरोग्य सुविधा कमी करून त्या जागेचा इतर कारणांसाठी वापर करण्याचा प्रयत्न म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाला दुय्यम स्थान देण्यासारखे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आरोग्य केंद्र हलवून उद्योग भवन उभारण्याच्या निर्णयाला विरोध
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अन्यत्र हलवून सदर ठिकाणी उद्योग भवन निर्माण करण्याचा निर्णय किंवा प्रस्ताव असल्याची माहिती नागरिकांमध्ये चर्चेत आहे. मात्र, आरोग्य केंद्राच्या जागेवर इतर प्रकल्प उभारण्यापेक्षा नागरिकांना आरोग्य सुविधा देणाऱ्या या केंद्राला कायम ठेवून त्याच ठिकाणी आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.नागरिकांच्या मते, उद्योग भवनासाठी पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते; परंतु सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि तातडीने उपचार मिळणारे आरोग्य केंद्र शहराच्या मध्यवर्ती भागातून हटविणे योग्य ठरणार नाही.
ग्रामीण रुग्णालयाचीही अपुरी क्षमता
आमगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय असले तरी तेथेही मनुष्यबळ, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि इतर मूलभूत सोयींच्या अभावामुळे अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र संदर्भित केले जाते, अशी नागरिकांची तक्रार आहे.अशा परिस्थितीत बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासारखे सहज उपलब्ध आणि मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा देणारे केंद्र बंद किंवा स्थलांतरित करणे म्हणजे उपलब्ध आरोग्य व्यवस्थेवर आणखी ताण निर्माण करण्यासारखे ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या आदेशानंतरही प्रशासनाची भूमिका चर्चेत
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री यांना रुग्णालयाचे वास्तुदर्शक चित्र व व्यवस्था बद्दल चित्रफित सामाजिक कार्यकर्ते यशवंत मानकर यांनी दाखविली यावर बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून ते अद्ययावत करण्याबाबत आश्वासन त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून केंद्र स्थलांतराबाबत भूमिका घेतली जात असल्यास त्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.एकीकडे राज्य शासनाकडून आरोग्य केंद्रासाठी निधी व सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून शासन निर्णय किंवा परिपत्रकांचा आधार घेत केंद्राच्या भवितव्याबाबत वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
त्यामुळे बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा निर्णय कोणत्या प्रशासकीय व तांत्रिक अहवालाच्या आधारे घेण्यात आला? शासनाच्या २८ मार्च २०२५ च्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील आरोग्य सुविधा वाढविण्याऐवजी उपलब्ध आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा निर्णय का घेतला जात आहे? तसेच केंद्राच्या जागेवर प्रस्तावित उद्योग भवनामागील नेमकी प्रक्रिया काय आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट करावीत, अशी मागणी होत आहे.
‘आरोग्य केंद्र बंद नको, अद्ययावत हवे’यावर नागरिक ठाम आहेत
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने अनेक वर्षे परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली आहे. पुरस्काराने गौरव झालेल्या या केंद्राचा इतिहास आणि आजची रुग्णसेवेची गरज लक्षात घेता त्याचे संवर्धन करण्याऐवजी अस्तित्व धोक्यात आणणे योग्य नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे.जर्जर इमारत असल्यास तिची दुरुस्ती करावी, आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, प्रसूती विभाग पुन्हा सुरू करावा आणि केंद्राला आधुनिक सुविधांनी सुसज्ज करावे, अशी मागणी पुढे आली आहे.
# नागरिकांचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराच्या चर्चेमुळे आमगाव शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आरोग्य केंद्र वाचविण्यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध घटक एकत्र येण्याची शक्यता असून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा कोणत्याही प्रशासकीय किंवा विकासकामापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अथवा स्थलांतरित न करता त्याच ठिकाणी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, बंद झालेली प्रसूती सेवा तातडीने सुरू करावी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून केंद्राचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात येत आहे.
# राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भवितव्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करून राज्य शासनाने तातडीने स्पष्ट निर्देश द्यावेत. जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या अथवा प्रस्तावित केलेल्या स्थलांतराच्या निर्णयाचा फेरविचार करून रुग्णसेवा कायम ठेवावी.तसेच २८ मार्च २०२५ च्या प्रस्तावित प्रशासकीय पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर बनगावसह रिसामा, किडंगीपार, पदमपूर, माल्ही, कुंभारटोली व बिरसी या गावांतील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा मिळण्यासाठी बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला विशेष निधी, मनुष्यबळ व आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘ज्या आरोग्य केंद्राने उत्कृष्ट रुग्णसेवेमुळे राज्यस्तरावर नावलौकिक मिळविला, ते केंद्र बंद करण्याऐवजी त्याला पुन्हा राज्यातील आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र बनविणे हीच काळाची गरज आहे,’ अशी भावना आमगाव परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नावर आता राज्य शासन नेमकी कोणती भूमिका घेते, तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थगिती देऊन केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी कोणते निर्देश दिले जातात, याकडे आमगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बनगांव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानतंरण होणार नाही, त्यात सुविधा वाढ़ करू :- आ. संजय पुराम
:-आमगाव शहरात व बनगांव, रिसामा, पदमपुर, बिरसी, माल्ही, कुंभारटोली व किडंगीपार या ग्रामीण क्षेत्रात नागरिकांमध्ये बनगांव प्राथमिक आरोग्य केंद्र स्थानंतरण होणार अशी बातमी पसरताच समाजिक कार्यकर्त्यांनी व राजकीय कार्यकर्ते यांनी याबद्दल तीव्र नाराजी वेक्त केली.आरोग्याच्या प्रश्नाला बगल देत जिल्हा परिषद गोंदियाने घेतलेली भूमिका न्यायोचित नसल्याची भावना वेक्त करीत याविरुद्द जण आंदोलनाचे स्वरूप देण्यात आले तर नगर परिषदेवर या विरुद्ध हल्लाबोल करण्यात आले. नगर परिषदचे विखंडण राजपत्र निघूनही ग्रामपंचायत कारभार सुरु होत नाही तर उलट बनगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानंतर करून आरोग्य सुविधा पाळविण्यात येते याबद्दल नागरिकांनी तीव्र भावना वेक्त करून निवेदन दिले. तर क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांना आमगाव येथे याबद्दल माहिती देऊन नागरिकांनी आपली तीव्र भावना वेक्त करून निवेदन दिले. यावर आमदार संजय पुराम यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना करून आरोग्य केंद्र स्थानंतरण होणार नाही तर त्यात सुविधा वाढ़ करण्याचे सूचना केली.
# नागरिकांची सर्वदलीय बैठक आज :– नागरिकांच्या आरोग्याला ऑक्सिजन देणारी व नावलौकिक असणारी आरोग्य केंद्र स्थानतंरण होऊ नये म्हणून आज सर्वदलीय बैठक आयोजित केली आहे. यात जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्द एल्गार पुकारण्याबद्दल भूमिका घेण्यात येईल अशी माहिती नागरिकांनी दिली.




