24.7 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home विदर्भ मालमत्ता कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा-मनपा आयुक्त यांचे निर्देश

मालमत्ता कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा-मनपा आयुक्त यांचे निर्देश

0
0

; नळ व गटार कनेक्शन तोडण्याचे आदेश
नागपूर : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक झोनमधील सर्वाधिक थकबाकीदारांची यादी तयार करून कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करावी तसेच आवश्यकतेनुसार मालमत्ता लिलावात काढावी, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी अधिकाऱ्यांना दिले. मनपाच्या मालमत्ता कर वसुली अभियानांतर्गत अधिकारी व कर संग्रहकांची कार्यशाळा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी थकीत मालमत्ता कराच्या वसुलीचा आढावा घेण्यात आला. २० ऑगस्टपासून सुरू झालेली विशेष वसुली मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत आतापर्यंत १८ कोटी ९० लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
मात्र, वसुलीचा दर अत्यंत कमी असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. प्रत्येक सहाय्यक आयुक्तांनी आपल्या झोनमधील सर्वाधिक १०० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. कारवाईसाठी पोलीस संरक्षण किंवा एनडीएस पथकाची आवश्यकता भासल्यास त्याचीही व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
#नळ, गटार कनेक्शन तोडणार
मालमत्ता कर थकविणाऱ्या इमारतींचे नळ कनेक्शन तोडण्याची तसेच गटार लाईनचे कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. खुल्या भूखंडाचा कर थकीत असल्यास संबंधित भूखंड लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, असेही आयुक्तांनी सांगितले.
वसुलीच्या कारवाईदरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या अथवा वसुलीत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, उपायुक्त गणेश राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.